ओलाचा दिवाळी धमाका...! बंगळुरूत शोरुमसमोरच स्कूटर पेटली, नेटकऱ्यांची प्रतिक्रिया...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 01:20 PM2024-10-26T13:20:02+5:302024-10-26T13:20:18+5:30
Ola Scooter Fire: अनेक ठिकाणी ग्राहकांनी ओलाचे शोरुम बंद पाडले आहेत. अशातच ओला त्यांच्या स्कूटर विक्री करण्यासाठी एकामागोमाग एक असे बंपर ऑफर्स देणारे सेल जाहीर करत आहे.
ओलाच्या स्कूटर जेव्हापासून बाजारात आल्या आहेत, तेव्हापासून चर्चेत आहेत. ग्राहकांच्या प्रचंड तक्रारी, स्कूटरमध्ये एवढ्या समस्या आहेत की त्या दुरुस्त करायलाच काही महिने जात आहेत. यामुळे ओला सर्व्हिस सेंटरसमोर या स्कूटर धुळ खात पडलेल्या आहेत. ग्राहकांच्या तक्रारींवरून ओलाला नुकतीच केंद्राची नोटीस आली होती. ओलाने फॉल्टी, दुय्यम दर्जाच्या स्कूटर विकल्याचे आणि सेवा देत नसल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ओलाची स्कूटर जळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कर्नाटकमध्येच दोन महिन्यांपूर्वी एका वैतागलेल्या ग्राहकाने ओलाचा शोरुम पेटवून दिला होता. अनेक ठिकाणी ग्राहकांनी ओलाचे शोरुम बंद पाडले आहेत. अशातच ओला त्यांच्या स्कूटर विक्री करण्यासाठी एकामागोमाग एक असे बंपर ऑफर्स देणारे सेल जाहीर करत आहे. यामुळे नेटकऱ्यांनी बंगळुरुतील स्कूटर जळतानाचा व्हिडीओ पाहून ओलाचा दिवाळी धमाका अशाच कमेंट केल्या आहेत.
बंगळुरुच्या बीटीएम लेआऊट भागातील ओलाच्या शोरुमबाहेर उभी केलेली ओलाची स्कूटर पेटली आहे. याचा व्हिडीओ काँग्रेसच्या एका नेत्याने सोशल मीडियावर टाकला होता. हा व्हिडीओ येताच नेटकरी त्यावर तुटून पडले आहेत. अनेकांनी ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांची खिल्ली उडविली आहे. तर अनेकांनी स्पेशल दिवाळी धमाका फिचर आदी कमेंट केल्या आहेत.
ओलाच्या शोरुममधील कर्मचाऱ्यांना संतापलेले ग्राहक धमक्या देत आहेत. ग्राहकांच्या समस्या दूर करण्याचे सोडून ओलाने एका शोरुमबाहेर बाऊंसर्स उभे केल्याचा व्हिडीओ काही दिवसांपूर्वीच कॉमेडिअन कुणाल कामरा याने पोस्ट केला होता. गेल्याच महिन्यात कामरा आणि भाविश अग्रवाल यांच्यात सोशल मीडियावर बाचाबाची झाली होती.