ओलाची फेकाफेकी? स्कूटरची विक्रीचा आकडा दाखविला वेगळा, खरा आला वेगळाच; गोलमाल काय आहे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:52 IST2025-03-21T14:52:37+5:302025-03-21T14:52:47+5:30
ओला ईलेक्ट्रीकच्या फेब्रुवारी महिन्यात विकल्या गेल्याचा दावा केलेल्या आणि रजिस्टर झालेल्या आकड्यात मोठी तफावत आढळली आहे.

ओलाची फेकाफेकी? स्कूटरची विक्रीचा आकडा दाखविला वेगळा, खरा आला वेगळाच; गोलमाल काय आहे...
सुरुवातीपासूनच ओला ईलेक्ट्रीकने अविश्वासाचे वातावरण निर्माण केले आहे. डिलिव्हरीला झालेला विलंब, ग्राहकांना आलेल्या ढीगभर समस्या आणि कालपर्यंत ओलाच्या सर्व्हिस सेंटरबाहेर धुळ खात पडलेल्या नादुरुस्त गाड्या. एक ना अनेक वाद हाईप करणाऱ्या कंपनीच्या नशीबी आले आहेत. अशातच आता नवा वाद सुरु झाला आहे.
ओला ईलेक्ट्रीकच्या फेब्रुवारी महिन्यात विकल्या गेल्याचा दावा केलेल्या आणि रजिस्टर झालेल्या आकड्यात मोठी तफावत आढळली आहे. यामुळे अवजड उद्योग आणि रस्ते मंत्रालयाने ओलाकडून याचा खुलासा मागविला आहे. काही दिवसांपूर्वीच ट्रेड सर्टिफिकेट नसल्याने ओलाच्या काही शोरुमवर छापे मारण्यात आले होते. यात आता हा नवा गोलमाल समोर आल्याने ओलाच्या अडचणीत वाढ झाली आहे. काही महिन्यांपूर्वी ओलाने कमी किंमतीत स्कूटर देण्याची ऑफर सुरु केली होती, तेव्हा शेअर बाजाराच्या नियामक संस्थेने ओलाला नोटीस पाठवून खुलासा मागितला होता. तसेच यानंतर ग्राहकांना सेवा देत नसल्याच्या असंख्य तक्रारींवरून देखील केंद्राने ओलाला नोटीसा पाठविल्या होत्या.
फेब्रुवारी महिन्यात ओलाच्या स्कूटरची अधिकृत नोंदविली गेलेली विक्री ही ८६५२ एवढीच होती. परंतू, २८ फेब्रुवारीला ओलाकडून आपण २५ हजार स्कूटर विकल्याचे जाहीर करण्यात आले होते. वाहन पोर्टलवर हा आकडा साडे आठ हजारच दिसत आहे. या एवढ्या मोठ्या तफावतीकडे केंद्राचेही लक्ष गेले आहे, त्यांनाही यामागे काहीतरी गोलमाल असल्याचा संशय आहे.
केंद्राच्या या नोटीसला उत्तर देण्याचे काम सुरु आहे. तसेच कंपनीच्या स्कूटरची चांगल्या प्रकारे विक्री सुरु आहे. फेब्रुवारीत रजिस्ट्रेशन करण्यात जरा उशीर झाला आहे. विक्रेत्यांसोबत चर्चा सुरु होती. वाहनाचे रजिस्ट्रेशन ही विक्रेत्यांची जबाबदारी असते, असे कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकला ४ राज्यांमधील त्यांच्या काही स्टोअर्ससाठी व्यापार प्रमाणपत्रांबाबत नोटिसा देखील मिळाल्या आहेत. कंपनी याला उत्तर देण्याची तयारी करत आहे. ओला इलेक्ट्रिकच्या ११,७८१ वाहनांची नोंदणी वाहन पोर्टलवर झालेली असून आता कंपनीचा विलंबाचा दावा खरा मानला तर फेब्रुवारी महिन्यात विक्री झालेल्या नेमक्या किती स्कूटर या ११ हजारच्या आकड्यात आहेत, असा सवाल उपस्थित होत आहे.