आपल्याच मुलांसाठी आपलीच बेफिकिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2023 03:30 PM2023-06-26T15:30:21+5:302023-06-26T15:30:27+5:30
Traffic:
- रवींद्र बिवलकर
(वरिष्ठ उपसंपादक)
अमेरिका, युरोपमध्ये अ बाळंतपणानंतरही तान्ह्या बाळाला मोटारीतून घरी नेण्यापूर्वी रुग्णालय त्या बाळासाठी गाडीमध्ये सुयोग्य सीट आहे की नाही, याची खातरजमा करून मगच बाळाला घरी नेण्याची परवानगी त्याच्या पाल्याला देते. कायद्यानुसारही तेथे गाडीतील नेहमीच्या आसनावर ठेवण्याची स्वतंत्र बेबी सीट असणे बंधनकारक आहे.... आणि आपल्या देशात..? आपण लाखो रुपयांच्या गाड्या घेतो खरे, पण त्या वापरण्यासाठी आपण मानसिकदृष्ट्या सक्षम आहोत का ? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावा आणि त्याच्या उत्तरात नकारघंटा वाजावी अशी हतबल परिस्थिती आहे.
भारतातील वाहन मालक विशेष करून खासगी वाहन मालक आपल्या कुटुंबासाठी गाडीचा वापर करताना अनेकदा बेदरकारीने करतात. असुरक्षितता जोपासण्याचा चंगच जणू ते बांधतात. आपल्या लहान मुलांना खास करून बाळासाठीही त्यांची गाडीमधून नेण्यासाठी कसलीही काळजी घेतल्याचे दिसून येत नाही. युरोप व अमेरिकेप्रमाणे
वेगवान आणि पॉश गाड्या घेण्याची चढाओढ असली तरी सुरक्षिततेबद्दल तेथे असलेली जाणीव भारतात नाही. भारतात यासाठी ना कोणाच्या मनात पक्के विचार आहेत ना ठोस कायदे..? दोन महिन्यांच्या मुलाला लांबच्या प्रवासाला नेण्याबद्दल तूर्तास नको असे सांगितले जाते. कारण त्या बालकाची रोगप्रतिकारक क्षमता विकसित झालेली नसते, ती होऊ दे, असा सल्ला परदेशात दिला जातो. तर भारतात बेबी कार सीटची आवश्यकताही वाटत नाही. ज्या पालकांना त्याचे महत्त्व वाटते ते आपल्या अपत्याच्या सुरक्षिततेची काळजी म्हणून बेबी सीट वापरतात, इतकेच भारतातील या संबंधातील अवधान आहे.
आपल्याकडे बेबी सीटबद्दल कोणतीही तरतूद नव्हती. मात्र, २०१४ नंतर काही वाहनांसंबंधात तशी सीट कार निर्मात्यांना आवश्यक करण्यात आली आहे. त्या तरतुदीनुसार १ ऑक्टोबर २०१४ नंतरच्या वाहनात ती बेबी सीट संलग्न करण्याची सुविधा देण्यास सांगण्यात आले आहे. तर एप्रिल २०१५ पासून १२ वर्षांपर्यंतच्या मुलांना कारमध्ये योग्य जागा सुरक्षिततेसाठी द्यावी, असे स्पष्ट केले. यापलीकडे आपण कायद्याच्या दृष्टीने काहीही केलेले नाही..
बेबी सीटबद्दलचे परदेशात असे आहेत नियम
- युरोप वा अमेरिकेतील कायद्यानुसार आठ किलो वजनापेक्षा कमी किंवा एक वर्षापर्यंतच्या बाळासाठी आसनावर मागील बाजूला तोंड करून बसणारी सीट वापरावी, असे म्हटले आहे.
- वर्षानंतर वा वीस किलोपर्यंत त्या बाळाचे वजन असेपर्यंत ते बाळ कारच्या पुढील दिशेला तोंड असणाऱ्या आसनावर बसवावे, आसनाला ती बेबी सीट बांधता यावी.
- न्यूयॉर्कमधील कायद्यानुसार ४ वर्षाच्या मुलाला स्वतंत्र बेबी सीट अत्यावश्यक असून, दोन वर्षांखालील मूल हे स्वतंत्र बेबी सीटवर मागे तोंड केलेल्या दिशेने बसविले पाहिजे.
- ४ ते ११ वर्षांपर्यंत स्वतंत्र वयोगटात विभागून त्यांच्यासाठी बेबी सीटवर बसून प्रवास करण्यासाठीही नियम आखून दिले गेले आहेत.