दुचाकीसाठीचा पासिंग लाइट वाहतुकीमध्ये अतिशय उपयुक्त संकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 09:02 PM2017-10-05T21:02:12+5:302017-10-05T21:31:47+5:30
मोटारसायकलीला दिलेल्या पासिंग लाइटचा वापर आवश्यक तेव्हा नेहमी करा. त्यामुळे अपघात टाळू शकता, तुमच्या प्रवासाच्या वेळेतही त्यामुळे बचत होऊ शकते.
रस्त्यावरून कोणत्याही प्रकारचे वाहन चालवताना आज तुमच्या वाहनाला देण्यात आलेल्या लाइट्सच्या सहाय्याने समोरच्या वाहनालास, मागून येणाऱ्या वाहनाला संकेत द्यायला हवेत. त्यासाठी वाहतुकीच्या नियमांमध्ये तसे सांगण्यातही आले आहे. मात्र त्याचे पालन अनेकांकडून केले जात नाही. त्यांना एक तर ते नियम नीट ठावे नसतात किंवा माहिती असूनही त्यांच्या हाताला तशी सवय झालेली नसते.काही काळापूर्वी साइड इंडिकेटर्स हा प्रकार भारतातील दुचाकी वाहनांना देण्यात आलेला नव्हता. मात्र नंतर त्यात तशी तरतूद केली गेली. या साइड इंडिकेटर्सप्रमाणेच असलेल्या हेडलॅम्पचा वापरही सकाळच्यावेळी करण्यात येतो.समोरून येणाऱ्या, वळणाऱ्या वाहनांना आपल्या वाहनांचे अस्तित्त्व कळावे म्हणून सीटी लॅम्प लावून वाहन चालवावे. मात्र तो संकेतही अनेक वाहने पाळत नाहीत.ड्रायव्हिंगमध्ये अशा लाइट्सच्या संकेतांची अतिशय गरज आहे, हे आता ओळखण्याची व ते संकेत पाळण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे वाहतुकीच्या वाढत्या प्रमाणाचा विचार करता वाहतुकीतील ताणही दूर होऊ शकतो. परस्परांमधील वाहनचालनाची समज वाढू शकते. दुचाकींमध्ये विशेष करून मोटारसायकलींमधील पासिंग लाइट देण्यात आला आहे. तर काही स्कूटर्सना अशी सुविधाही दिली जात आहे. हा पासिंग लाइट अतिशय महत्त्वाचा आहे. समोरून येणाऱ्या वाहनाला आपले अस्तित्त्व, आपली बाजू, रस्त्यांच्या रूंदीचा, वळणाचा अंदाज त्यामुळे झटकन येतो. हेडलाइटद्वारेच ही सोय असते. त्याचा वापर सर्वांकडून होण्याची गरज आहे. त्यामुळे सुरक्षिततेबरोबरच वाहनप्रवासाचा वेळही वाचू शकतो. बेलपुश प्रकारचा हा स्विच असतो. तो दाबून लगेच सोडणे व तशी क्रिया आवश्यक तितक्यावेळा करणे या प्रकारच्या सिग्नलिंगमध्ये अपेक्षित असते.
गावांमधील रस्ते, महामार्ग, विभाजक नसलेले रस्ते, छोट्या रुंदीचे रस्ते यावर रात्री ये-जा करतानाच नव्हे तर सकाळच्यावेळीही या पासिंगलाइटचा वापर करणे गरजेचे असते. मोटारसायकलीला साधारण समोरून सकाळच्यावेळी पाहिल्यावर त्या मोटारसायकलीचा हेडलॅम्प लावलेला नसेल तर लांबून अंदाज येत नाही.अशावेळी त्या मोटारसायकलीच्या चालकाने हेडलॅम्पलावलेला असला पाहिजे,किमान त्याचा सिटीलाइट सुरू असला पाहिजे. पण तो लावलेला नसला तर किमान त्वरेने पासिंग लाइट देऊन समोरून येणाऱ्या वाहनाला संकेत दिला पाहिजे.रात्री वा दिवसा मोटारसायकलीवर असलेल्या स्वाराने ओव्हरटेक करताना वा डाव्या व उजव्या बाजूला जातानाही पासिंग लाइटचा वापर करायला हवा. त्यामुळे समोरच्या वाहनांचे वा डाव्या किंवा उजव्या बाजूने येणाऱ्या वाहनांचे लक्ष वेधले जाते व तो दुसरा चालकही सावध होतो. त्यामुळे दुचाकीला एक प्रकारचे वाहतुकीमधील सुरक्षिततेच्या संकेताचे संरक्षण मिळते. रात्रीच्यावेळी समोरून येणाऱ्या वाहनाच्या चालकालाही तुम्ही ओव्हरटेक करीत असाल, किंवा तो वाहनचालक आपले वाहन तुमच्या रांगेतील भागात जास्त प्रमाणात आला असेल तर त्यावेळी त्याला पासिंग लाइटच्या संकेताने तुम्ही तुमच्या अस्तित्त्वाची जाणीव करून देत असता. तसेच तुमच्या वाहनाच्या बाजूंचा व रस्त्याचाही अंदाज त्याला देत असता. अशामुळे अनेकदा अपघात होण्याची शक्यताही कमी होते.वाहन चालवताना व वापरताना सर्वात महत्त्वाची गरज असते ती एकंदर वाहनांचा उपयोग करताना कोणत्याही तऱ्हेचा छोटामोठा अपघातही होऊ नये, वाहनचालन,प्रवास हा सुरक्षित झाला पाहिजे, यासाठीच हे संकेत व सिग्निलिंग असते, त्याचा योग्य वापर व्हायला हवा.