ई-स्कूटरची खरेदी टाळताहेत लोक; ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाच्या कामगिरीबाबत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2022 08:13 AM2022-08-25T08:13:18+5:302022-08-25T08:13:38+5:30
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे या वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाची कामगिरी हे चिंतेचे मुद्दे बनले आहे.
मुंबई :
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या घटना घडल्यामुळे या वाहनांची खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या मनात सुरक्षा आणि वाहनाची कामगिरी हे चिंतेचे मुद्दे बनले आहे. एका ऑनलाइन सर्वेक्षणातून असे निदर्शनास आले आहे की, याच कारणांमुळे लोक इलेक्ट्रिक स्कूटरची खरेदी टाळताना दिसून येत आहेत.
ऑनलाइन मंच ‘लोकलसर्कल’ने हे सर्वेक्षण केले आहे. त्यानुसार, इलेक्ट्रिक स्कूटरची सुरक्षितता आणि कामगिरी यांबाबतची अनिश्चितता यंदाच्या ऑगस्टमध्ये वाढून ३२% झाली. गेल्या वर्षी ती अवघी २% होती. सर्वेक्षणात २९२ जिल्ह्यांतील ११ हजारपेक्षा अधिक लोकांची मते जाणून घेण्यात आली. यातील ४७% लोक प्रथम श्रेणीच्या शहरांतील, तर ३३% लोक द्वितीय श्रेणीच्या शहरांतील आहे. २०% लोक तिसऱ्या व चौथ्या श्रेणींची शहरे तसेच ग्रामीण भागातील आहेत.
खरेदीची इच्छा मात्र...
अनेक लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यास इच्छुक आहेत. तथापि, त्यांना सुरक्षा व कामगिरी याबाबत चिंता वाटते. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ११ हजार लोकांपैकी केवळ १ टक्का लोकांनी पुढील ६ महिन्यांत इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्याचे निश्चित केले आहे.
सर्वेक्षणात काय आढळले?
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास जास्त लोक इच्छुक नाहीत. ३१% कुटुंब इलेक्ट्रिक वाहन चालवत नाहीत. ०९% लोकांचे म्हणणे आहे की, त्यांच्याकडे आधीच वाहन आहे व नवीन दुचाकी वाहन खरेदी करण्याची त्यांची कोणतीही योजना नाही.