Auto Expo 2023: लोक मला दोषी ठरवतायत; ऑटो एक्स्पोमध्ये नितीन गडकरींचे धक्कादायक विधान, का म्हणाले असे?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 03:56 PM2023-01-12T15:56:46+5:302023-01-12T15:57:47+5:30
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ऑटो एक्स्पो २०२३ चे औपचारिक उद्घाटन केले.
ऑटो एक्स्पोचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिला दिवस टाटा मारुती या कंपन्यांनी गाजविला. एमजीने देखील ईव्ही, नवीन हॅरिअर लाँच केली. परंतू आजच्या दिवशी फ्लेक्स फ्युअलच्या कार लाँच करण्यात आल्या. आजही अनेक कंपन्या त्यांची वाहने, तंत्रज्ञान जगाला दाखविणार आहेत. सामान्यांना हा एक्स्पो उद्यापासून सुरु होणार आहे.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ऑटो एक्स्पो २०२३ चे औपचारिक उद्घाटन केले. "कंपन्यांना रिसायकलिंग करून कमी किमतीत कच्चा माल मिळेल. कंपन्या त्यांचे स्क्रॅपिंग युनिट्स उघडू शकतात. याचा शेवटी निर्मात्यालाच फायदा होईल. काही वेळा प्रदूषणामुळे मला दिल्लीत यावेस वाटत नाही.", असे गडकरी यावेळी म्हणाले.
प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहने घेणे हा आमच्यासाठी चांगला पर्याय आहे. इलेक्ट्रिक वाहने आमच्यासाठी उपयुक्त आहेत. आम्ही रस्ते बनवत आहोत आणि त्याचा तुम्हालाही फायदा होईल. मी 2004 पासून फ्लेक्स इंधनाचे स्वप्न पाहत आहे. ब्राझीलमध्ये आधीपासूनच फ्लेक्स इंधन तंत्रज्ञान आहे. इथेनॉल 60-62 रुपयांच्या आसपास येऊ शकते तर पेट्रोल सध्या 100 च्या आसपास आहे. हायड्रोजनची किंमत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सकडून 100 रुपयांपर्यंत खाली येऊ शकते. सेमी कंडक्टरची समस्या अत्यंत गंभीर आहे, असे गडकरी म्हणाले.
यानंतर गडकरींनी धक्कादायक विधान केले आहे. लोकांनी रस्ते सुरक्षेवर लक्ष दिले पाहिजे. लोक मला दोष देत आहेत. म्हणताहेत की मी रस्ते बनवतोय आणि रस्ते अपघात वाढत चालले आहेत. १८ ते ३४ वयातील तरुणांचे या अपघातात सर्वाधिक मृत्यू होत आहेत. यामुळे तुम्ही रस्ते सुरक्षेवर लक्ष द्या आणि सर्वांना त्यासाठी सुशिक्षित करा. आपल्या देशात २०२४ पर्यंत अमेरिकेच्या तोडीचे रस्ते तयार होणार आहेत, असेही गडकरी यांनी म्हटले.