लोकांचा भर बाईकवर; विक्री होतेय भरमसाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 07:45 AM2023-12-18T07:45:38+5:302023-12-18T07:46:21+5:30
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात संपलेल्या सणासुणीच्या हंगामात वाहनाच्या सर्व विभागात मजबूत वृद्धी पाहायला मिळाली.
नवी दिल्ली : युटिलिटी वाहनांना उत्तम मागणी आल्यामुळे प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीत नोव्हेंबर २०२३ मध्ये वार्षिक आधारावर ४ टक्के वाढ झाली. वाहन उत्पादकांची संघटना ‘सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाइल मॅन्युफॅक्चरर्स’ने (सियाम) मंगळवारी ही माहिती दिली. त्यानुसार, नोव्हेंबरमध्ये कंपन्यांनी डीलर्सना ३,३४,१३० वाहनांचा पुरवठा केला. नोव्हेंबर २०२२ मध्ये हा आकडा ३,२२,२६८ इतका होता.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत यावर्षी नोव्हेंबर २०२३ मध्ये दुचाकी वाहनांची विक्री ३१ टक्के वाढून १६,२३,३९९ युनिटवर गेली. तर याच कालखंडात तीनचाकी वाहनांच्या विक्रीतही ३१ टक्के वाढ झाली. यंदाच्या नोव्हेंबरमध्ये ५९,७३८ तीनचाकी वाहने विकली गेली. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये हा आकडा ४५,६६४ इतका होता.
सियामचे महासंचालक राजेश मेनन यांनी सांगितले की, नोव्हेंबर २०२३ मध्ये प्रवासी वाहनांची विक्री वार्षिक आधारावर ३.७ टक्के वाढली. ३.३४ लाख प्रवासी वाहनांची घाऊक विक्री या महिन्यात झाली. ही आतापर्यंतची सर्वाधिक विक्री ठरली आहे.
नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात संपलेल्या सणासुणीच्या हंगामात वाहनाच्या सर्व विभागात मजबूत वृद्धी पाहायला मिळाली. मजबूत आर्थिक वृद्धीचे बळ मिळाल्यामुळे २०२३ हे वर्ष वाहन उद्योगासाठी वृद्धी देणारे राहील, हा कल २०२४ पर्यंत कायम राहील, असा अंदाज आहे.
विनोद अग्रवाल, अध्यक्ष, सियाम