या कंपनीच्या पेट्रोल-डिझेल कार बंद होणार; पुढील वर्षापासून फक्त EV गाड्या विकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 08:07 PM2023-10-26T20:07:15+5:302023-10-26T20:07:24+5:30
Volkswagen: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी पाहता अनेक कंपन्या EV कडे शिफ्ट होत आहेत.
Volkswagen Plan For Norway: वातावरणातील प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने आणि भविष्यातील इंधनाचा तुटवडा लक्षात घेऊन अनेक ऑटोमोबाईल कंपन्या इलेक्ट्रिक गाड्या बनवण्यावर भर देत आहेत. यातच आता फॉक्सवॅगनने या वर्षाच्या अखेरीस नॉर्वेमध्ये इंटरनल कंब्शन इंजिन(ICE) वाहनांची विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच पुढील वर्षापासून नॉर्वेमध्ये पेट्रोल किंवा डिझेल कारची विक्री होणार नाही.
यापुढे नॉर्वेमध्ये फॉक्सवॅगनच्या इलेक्ट्रिक गाड्या (EVs) विकल्या जातील. नॉर्वेमधील फोक्सवॅगनची आयातदार - मोलर मोबिलिटी ग्रुपने याबाबतची माहिती दिली आहे. फॉक्सवॅगन या वर्षी डिसेंबरमध्ये नॉर्वेमध्ये आपल्या शेवटच्या ICE कारची विक्री करेल. डिसेंबर 2023 पर्यंत सर्व ICE कार ऑर्डर पूर्ण करण्याची कंपनीची योजना आहे. त्यानंतर, कंपनी फक्त त्यांचे इलेक्ट्रिक मॉडेल्स विकेल.
इलेक्ट्रिक वाहनांमध्ये नॉर्वे आघाडीवर
लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, इलेक्ट्रिक वाहनांच्या बाबतीत नॉर्वे जगात आघाडीवर आहे. देशातील 20% पेक्षा जास्त वाहने ईव्ही आहेत आणि नवीन वाहनांच्या विक्रीत सुमारे 84% हिस्सा ईव्हीचा आहे. नॉर्वेजियन रोड फेडरेशनच्या मते प्लग-इन हायब्रिड जोडल्यावर हा आकडा 90% पर्यंत पोहोचेल.
नॉर्वे सरकारची योजना
रिपोर्ट्सनुसार, नॉर्वे सरकार 2025 पर्यंत सर्व ICE वाहनांवर बंदी घालण्याची योजना आखत आहे. असे करणारा हा जगातील पहिला देश असेल. मात्र, फॉक्सवॅगनने वर्षभरापूर्वीच देशात आयसीई वाहनांची विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला होता. इतर कंपन्या असा निर्णय घेणार का, हे पाहणे महत्वाचे आहे.