पेट्रोल-डिझेलची सुद्धा एक्सपायरी डेट असते का? जाणून घ्या, किती दिवस कार उभी राहिली तर खराब होऊ शकते पेट्रोल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2022 02:37 PM2022-10-31T14:37:26+5:302022-10-31T14:45:35+5:30
petrol diesel expiry date : पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते, त्यावेळी कच्चे तेल रिफाइन करताना अनेक केमिकल्स मिसळली जातात.
नवी दिल्ली : जेव्हा आपण दुकानातून एखादी वस्तू विकत घेतो, तेव्हा त्या वस्तूच्याकिंमतीसह आपण सर्वजण एक गोष्ट पाहतो, ती म्हणजे एक्सपायरी डेट. पण तुम्ही कधी विचार केला आहे, पेट्रोलचीही एक्सपायरी डेट असते असा?... पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किमती आणि सतत वाढणाऱ्या ट्रॅफिक जॅममध्ये आपण अनेकदा आपली कार बराच वेळ पार्क करून ठेवतो. काही वेळा कारची टाकी काही आठवडे किंवा महिने पेट्रोलने भरलेली असते. कारच्या टाकीत भरलेले पेट्रोल खराब आहे का? तर होय, तर किती दिवसात? चला जाणून घेऊया याचे उत्तर...
पेट्रोल आणि डिझेल तयार केले जाते, त्यावेळी कच्चे तेल रिफाइन करताना अनेक केमिकल्स मिसळली जातात. यापैकी एक केमिकल इथेनॉल देखील आहे. या केमिकल्समुळे पेट्रोल आणि डिझेलची शेल्फ लाइफ कमी होते. भारतातही सध्या मिळणाऱ्या पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळून विकले जात आहे. तुम्ही कार दीर्घकाळ पार्क करून ठेवल्यास त्यातील पेट्रोलचे केमिकल्स तापमानासोबत वाफेत रूपांतर होते. जेव्हा केमिकल्सला बाहेर येण्याची संधी मिळत नाही, तेव्हा पेट्रोल आणि डिझेल खराब होऊ लागते.
पार्क केलेल्या कारमध्ये भरलेले पेट्रोल किती दिवसात खराब होईल, ते तेथील तापमानावर अवलंबून असते. तापमान जितके जास्त असेल तितक्या लवकर डिझेल-पेट्रोल खराब होऊ शकते. उदाहरणार्थ, जर तुमची कार कडक उन्हाळ्यात 1 महिना सतत पार्क केली असेल तर त्या वेळी तेल खराब होऊ शकते.
एका रिपोर्टनुसार, सीलबंद कंटेनरमध्ये पेट्रोल वर्षभर साठवता येते. तर कारच्या टाकीमध्ये ते 20 डिग्री सेल्सिअस तापमानात 6 महिने खराब होणार नाही. दुसरीकडे, जर तापमान 30 डिग्री सेल्सिअस असेल तर तीन महिन्यांनंतर ते खराब होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर तुम्ही कार जास्त वेळ उभी ठेवत असाल तर काही वेळाने कार चालवत राहणे चांगले ठरू शकेल.