इलेक्ट्रिक वाहनांसाठी सरकारची नवीन योजना; PM E-Drive Scheme चा कसा मिळेल लाभ?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 05:33 PM2024-09-12T17:33:27+5:302024-09-12T17:39:03+5:30
PM E-Drive Scheme : इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सबसिडी योजना सुरू केली आहे.
PM E-Drive Scheme : नवी दिल्ली : देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी फेम I आणि फेम II सबसिडी योजना लागू केल्या होत्या. केंद्र सरकारने देशात इलेक्ट्रिक वाहनांसाठी फेम I सबसिडी संपल्यानंतर फेम II सबसिडी योजना सुरू केली होती. दरम्यान, ३१ मार्च २०२४ रोजी इलेक्ट्रिक वाहनांवरील फेम II सबसिडी योजनेची मुदत संपली.
त्यानंतर ही योजना पुन्हा लागू करण्यात येईल, अशी शक्यता लोकांना वाटत होती. मात्र, आता सरकारने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सबसिडी योजना सुरू केली आहे. इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने पुन्हा एकदा इलेक्ट्रिक वाहनांसाठी नवीन सबसिडी योजना सुरू केली आहे. या योजनेला पीएम ई-ड्राइव्ह योजना असे नाव देण्यात आले आहे. ही योजना आता फेम II योजनेची जागा घेणार आहे.
पीएम ई-ड्राइव्ह योजनेचे बजेट
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने पीएम ई-ड्राइव्ह योजनेचे बजेट १०,९०० कोटी रुपये ठेवले आहे. या योजनेत इलेक्ट्रिक टू-व्हीलर, थ्री-व्हीलर, ॲम्ब्युलन्स, ट्रक आणि इतर ईव्ही वाहनांसाठी बजेट ठेवण्यात आले आहे. सरकारलाही या उपक्रमातून पर्यावरणाचे रक्षण करायचे आहे. इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्चर्स कंपन्यांनीही पीएम ई-ड्राइव्ह योजनेचे स्वागत केले आहे. सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर कंपनीच्या सीईओंनी पीएम ई-ड्राइव्ह योजना सरकारचे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे सांगितले आहे.
फेम II योजनेचे बजेट किती होते?
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्र सरकारने २०१५ मध्ये फेम योजना सुरू केली. ९ वर्षे चाललेली ही योजना दोन टप्प्यात चालवण्यात आली. फेम II योजनेचे बजेट ११,५०० कोटी रुपये होते, ज्यामध्ये १३,२१,८०० ईव्हीना सबसिडी देण्यात आली. आता नवीन पीएम ई-ड्राइव्ह योजनेंतर्गत, राज्य परिवहन उपक्रम आणि सार्वजनिक वाहतूक संस्थांद्वारे १४,०२८ इलेक्ट्रिक बस खरेदीसाठी ४,३९१ कोटी रुपये देखील वाटप करण्यात आले आहेत.
पीएम ई-ड्राइव्ह योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
पेट्रोल आणि डिझेल वाहनांना पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदी करणाऱ्यांना पीएम ई-ड्राइव्ह योजनेचा लाभ मिळेल. या योजनेत तुम्ही ॲम्ब्युलन्ससह इलेक्ट्रिक टू-व्हीलर, इलेक्ट्रिक थ्री-व्हीलर, इलेक्ट्रिक बस आणि ट्रक खरेदी करू शकता. पीएम ई-ड्राइव्ह योजना दोन वर्षांसाठी लागू करण्यात आली आहे, म्हणजेच पीएम ई-ड्राइव्ह योजना ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू असेल, ज्यामध्ये तुम्ही इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर सबसिडी मिळवू शकता.