सिग्नल तोडल्याची पावती फाडली; चालक मनीष तिवारी यांनी सहकुटुंब रस्तारोको केला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2019 10:37 AM2019-10-07T10:37:40+5:302019-10-07T10:41:28+5:30
2 ऑक्टोबरला वाहतूक पोलिसांनी पावती फाडली होती. सिग्नल तोडल्याचे कारण सांगितले होते.
नवी दिल्ली : चौकातील सिग्नल तोडल्यामुळे टॅक्सी चालकाने कुटुंबासोबत रस्त्यावर धरणे आंदोलन केल्याचा प्रकार घडला. यामुळे वाहतूक कोंडी झाली. अखेर पोलिसांनी त्यांना उचलून रस्त्याच्या बाजुला नेऊन ठेवले.
रस्ता जाम करणाऱ्या चालकाचे नाव मनीष तिवारी आहे. तो टॅक्सी चालवतो. मनीषचा आरोप आहे की, 2 ऑक्टोबरला वाहतूक पोलिसांनी पावती फाडली होती. त्याला सिग्नल तोडल्याचे कारण सांगितले होते. मनीषने सांगितले की तेव्हा त्यांनी कोणतीही पावती घेतली नाही आणि तक्रार करण्यासाठी पोलिस ठाण्यामध्ये गेलो. तिथे चुकीच्या पद्धतीने पावती केल्याचे सांगितले आणि वाहतूक पोलिसांनी कानशिलात मारल्याचाही आरोप केला. पोलिसांमध्ये तक्रार देऊन मनीष घरी गेला. तेव्हापासून तो टॅक्सी चालवू शकत नव्हता, कारण वाहतूक पोलिसांनी त्याच्या कारचे कागदपत्र काढून घेतले होते.
रविवारी सकाळी मनीष यांची पत्नी उर्वशी, छोटा मुलगा अनुभव आणि मोठा अभिनव यांच्यासोबत त्या सिग्नलवरून न्यायालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर आंदोलनाला बसले. यामुळे हा रस्ताच जाम झाला. वाहतूक कोंडी झाल्याचे पाहून पोलिस तिथे पोहोचले. मनीष यांच्या कुटुंबाला समजाविण्याचा प्रयत्न झाला. मनीष यांनी सांगितले की, जेव्हा त्यांनी सिग्नल पार केला तेव्हा लाल लाईट लागण्यासाठी 7 सेकंद उरलेले होते. मात्र, तरीही वाहतूक पोलिसांनी त्रास देण्याच्या उद्देशाने पावती केली. तसेच मारहाणही केली.
एकीकडे मनीष ऐकत नाही आणि वाहतूक कोंडीही वाढू लागल्याने अखेर पोलिस अधिकारीच तिथे पोहोचले. त्यांनी मनीषच्या कुटुंबाला पोलिस ठाण्यामध्ये येण्यास सांगितले. मात्र तरीही ते रस्त्यावरून हटले नाहीत. यानंतर महिला पोलिसांना बोलवून हाता पायाला पकडून उचलत रस्त्याच्या बाजुला नेण्यात आले. पोलिसांच्या कारवाईमुळे त्रस्त झालेल्या चालकाने धावत्या वाहनांसमोर उडी घेऊन आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी सांगितले की, पावत्या न्यायालयाच्या आदेशावरून फाडल्या जात आहेत. मनिषने त्याची बाजू न्यायालयात मांडावी.