Pravaig Defy EV: लवकरच येतेय 'ही' खास इलेक्ट्रिक SUV, सिंगल चार्जवर देईल 500Km ची रेन्ज, खास आहेत फीचर्स
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:51 AM2022-11-19T00:51:20+5:302022-11-19T00:52:22+5:30
या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक अॅडव्हॉन्सड फीचर्स देण्यात आले आहेत, जे केवळ लक्झरी वाहनांमध्येच बघायला मिळतात, असा दावाही कंपनीने केला आहे.
बेंगळुरूतील इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप Pravaig Dynamics लवकरच आपली पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही Defy देशांतर्गत बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही येणाऱ्या 25 नोव्हेंबरला देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत अधिकृतपणे प्रदर्शित करण्यात येणार आहे. ही एक प्रीमियम इलेक्ट्रिक एसयूव्ही असेल. महत्वाचे म्हणजे कंपनी या कारला फ्लॅगशिप किलर म्हणत आहे. याच बरोबर, या इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये अनेक अॅडव्हॉन्सड फीचर्स देण्यात आले आहेत, जे केवळ लक्झरी वाहनांमध्येच बघायला मिळतात, असा दावाही कंपनीने केला आहे.
Pravaig Defy ही एक 5 सीटर इलेक्ट्रिक एसयूव्ही आहे. संबंधित स्टार्टअपने साधारणपणे दोन वर्षांपूर्वी एक इलेक्ट्रिक सेडान कार Extinction MK1 देखील शोकेस केली होती. कंपनीने दावा केला होता, की ती इलेक्ट्रिक कार सिंगल चार्जमध्ये 500 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेन्ज आणि ताशी 200 किलोमीटर धावण्यास सक्षम होती. मात्र, दोन दरवाजे आणि चार सीट असलेली ही इलेक्ट्रिक सेडान अद्याप विक्रीसाठी लॉन्च करण्यात आलेली नाही.
कशी आहे Pravaig Defy इलेक्ट्रिक एसयूव्ही -
कंपनीने म्हटले आहे, की Pravaig Defy ही SUV सिंगल चार्जमध्ये 504 किलोमीटरपर्यंतची ड्रायव्हिंग रेन्ज देईल. विशेष म्हणजे, हीची बॅटरी अवघ्या 30 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल. जर कंपनीने केल्या दाव्यानुसार या एसयूव्हीने रेन्ज दिली, तर ही सर्वाधिक रेन्ज देणारी इलेक्ट्रिक एसयूव्ही ठरेल.
सागण्यात येते, की ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 402 hp ची पॉवर आणि 620 Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. पिकअपच्या बाबतीतही ही एसयूव्ही अत्यंत चांगली असेल. ही कार केवळ 4.9 सेकेंदांतच 0 ते 100 किलोमीटर प्रतितास वेग धारण करण्यास सक्षम आहे. 210 किलोमीटर प्रति तास एवढा टॉप स्पीड असलेली ही एसयूव्ही, बाजारात उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक एसयूव्ही, जसे Volvo XC40 रिचार्ज आणि Kia EV6 ला टक्कर देईल.
Pravaig चे म्हणणे आहे, Defy ऑन-बोर्ड वायफाय, लॅपटॉपसाठी 15-इंचांचा डेस्क, एक लिमोसिन पार्टीशन, चार्जिंग डिव्हाइससाठी 220V सॉकेट, PM 2.5 एअर फिल्टरसह एक एअर क्वालिटी इंडेक्स, व्हॅनिटी मिरर, एक प्रिमियम साउंड सिस्टिम, USB सॉकेट आणि वायरलेस चार्जिंगसह येईल. याशिवाय, हे स्क्रीन मिररलिंकलाही सपोर्ट करतील.