नवीन वाहनांच्या किमती होणार कमी; तीन, पाच वर्षांच्या विम्याचे निर्बंध शिथिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 02:16 AM2020-07-24T02:16:07+5:302020-07-24T06:32:41+5:30
१ आॅगस्टपासून धोरणाची अंमलबजावणी
मुंबई : एका व्यक्तीने गेल्या महिन्यात जीप कंपनीची स्पोर्ट्स प्लस ही चारचाकी २१ लाख ८६ हजार रुपये किमतीला विकत घेतली. त्यात सर्वसमावेशक (कॉम्प्रिहेन्सिव्ह) विम्याची रक्कम होती १ लाख रुपये. याच व्यक्तीने जर आॅगस्ट महिन्यात ही कार खरेदी केली असती, तर किंमत सुमारे ६० ते ६५ हजारांनी कमी झाली असती. किंमत कोरोनामुळे नव्हे, तर इन्शुरन्स रेग्युलेटरी अॅथॉरिटी आॅफ इंडियाने नव्या गाड्यांवरील विम्याचा नियमांमध्ये शिथिलता आणल्यामुळे कमी होणार आहे. या धोरणामुळे दुचाकींची किंमतही तीन ते चार टक्क्यांनी कमी होणार आहे.
वाहनांची खरेदी केल्यानंतर पहिल्या टप्प्यातील विम्याची मुदत संपल्यानंतर पुढील विमा काढण्यास वाहनचालक टाळाटाळ करतात, असे सर्वेक्षणात उघड झाले होते. त्यामुळे आयआरडीआयएने चारचाकी वाहनांची खरेदी करताना, तीन वर्षे आणि दुचाकींसाठी पाच वर्षांचा थर्ड पार्टी इन्शुरन्स २०१८ सालापासून सक्तीचा केला होता. त्यामुळे २ ते ३ टक्के रक्कम विमा काढण्यासाठी खर्च करावी लागत असल्याने वाहनांची किंमत वाढत असे, परंतु आयआरडीआयएनेच हे निर्बंध आता शिथिल केले आहेत.
वाहन खरेदी करताना आता एक वर्षाचाच कॉम्प्रिहेन्सिव्ह विमा काढण्याचे बंधन वाहन मालकांवर असेल. साधारण ६० ते ७० हजार रुपये किमतीची मोटरसायकल खरेदी केल्यास, त्यावर पाच ते सहा हजार रुपये विम्यापोटी भरावे लागतात. ती रक्कम आता दोन ते अडीच हजारांवर येईल, अशी माहिती विमा कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून हाती आली आहे. केवळ वाहनांची किंमतच नव्हे, तर त्यांची क्षमता किती सीसींची आहे, त्यावर विम्याचा प्रीमियम निश्चित होत असतो. जास्त सीसी असलेल्या वाहनांसाठी दीड ते दोन लाखांपर्यंतचा प्रीमियमही भरावा लागतो. महागड्या वाहनांच्या किमतीत नव्या धोरणामुळे सर्वाधिक घट होईल, असेही त्यांनी सांगितले.