मारुतीच्या ब्रेकमध्ये समस्या; 9925 कार माघारी बोलविल्या, ब्रेकच न लागण्याचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 10:59 AM2022-10-30T10:59:43+5:302022-10-30T10:59:58+5:30
कंपनीने सर्वच वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निस परत मागविलेल्या नाहीत. पहा तुमची आहे का?
मारुतीने पुन्हा एकदा ब्रेकच्या समस्यांमुळे काही कार माघारी बोलविल्या आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर याची माहिती देण्यात आली आहे. यानुसार कंपनीने 9925 कार रिकॉल केल्या आहेत. ही समस्या ब्रेकशी संबंधीत असून कंपनी ती दुरुस्त करणार आहे.
कंपनीने जवळपास १० हजार कार माघारी बोलविल्या आहेत. यामध्ये वॅगन आर, सेलेरिओ आणि इग्निस या कार आहेत. तीन हॅचबॅक कारच्या मागील ब्रेक असेंबली पिन भागामध्ये दोष असल्याचा संशय आहे. यामुळे कार चालविताना जास्त आवाज येतो. कारच्या ब्रेकची कार्यक्षमता देखील कमी होऊ शकते. या दोषामुळे कंपनीने गाड्या परत मागवल्या आहेत.
कंपनीने सर्वच वॅगन आर, सेलेरियो आणि इग्निस परत मागविलेल्या नाहीत. 3 ऑगस्ट 2022 ते 1 सप्टेंबर 2022 या काळात बनविलेल्या कारच माघारी बोलविल्या आहेत. ज्या गाड्या परत मागवण्यात आल्या आहेत, त्यांची माहिती कंपनीच्या वेबसाइटवर देण्यात आली आहे. या गाड्या परत मागवल्याची माहिती कंपनीने दिली आहे. कंपनीच्या सर्व सर्व्हिस सेंटरवर सदोष पार्ट दुरुस्त करण्यासाठी नवीन पार्ट्स उपलब्ध करून दिले जात आहेत. कंपनीच्या वतीने ग्राहकांशी संपर्क साधला जात आहे. ही दुरुस्ती कंपनी मोफत करून देणार आहे.