मोटारीत उन्हापासून बचाव करण्यासाठी करा सनवायझरचा वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2017 06:00 PM2017-09-05T18:00:00+5:302017-09-05T18:00:00+5:30
कारमध्ये काच लावल्यानंतर उन्हाचा त्रास होतो म्हणून डार्क फिल्म लावली गेली, कायद्याने आज या फिल्मवर बदी असल्याने त्या फिल्मऐवजी काळ्या रंगाच्या सच्छीद्र कापडाला एका तारेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले
उन्हापासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी माणसाने काय काय प्रकारची साधने शोधली आहेत, ते पाहिले तर नवलच वाटावा. घर बांधल्यानंतरही खिडकीतून येणाऱ्या सूर्याच्या किरणांपासून बचाव करण्यासाठी माणसाने पडद्यांचा शोध लावला. मग पडद्यापेक्षाही जास्त प्रभावी अशा काचांचा शोध लावला. विशिष्ट प्रकारची घरबांधणी करूनही पाऊस, उन,थंडी अशांपासून माणसाने संरक्षण करून घेतले. गरज ही या शोधांची जननी म्हणतात, ते उगीच नाही. कारमध्ये काच लावल्यानंतर उन्हाचा त्रास होतो म्हणून डार्क फिल्म लावली गेली, कायद्याने आज या फिल्मवर बदी असल्याने त्या फिल्मऐवजी काळ्या रंगाच्या सच्छीद्र कापडाला एका तारेच्या चौकटीमध्ये बंदिस्त केले व हवेचा दाब काचेवर देऊन त्याद्वारे ती काळ्या कापडाची चौकट काचेला घट्ट बसेल म्हणून सनवायझर - सनशेड तयार केली गेली. त्यातही पुढे शोध लागले व त्या चौकटीला मॅग्नेट्स म्हणजे लोहचुंबक लावून कारच्या खिडकीला ती सहजपणे घट्ट पकडून बसतील अशी सनशेड सध्या बाजारात दिसू लागली आहे. अगदी सहज सोपा उपाय आहे खरा पण तो शोध आपल्यापयर्ंत पोहोचायला इतका काळ जावा लागला.
कारच्या आतील बाजूने ही सनशेड् बसते. तुम्हाला हवी तेवा ती काढता येते, फोल्डही करता येते. बाहेरच्याला आतील झटकन दिसत नाही, मात्र तुम्ही कारमधून बाहेरचे सारे कारी कडक उन असले तरी गॉगलमधून पाहिल्यासारखे पाहू शकता. अशा प्रकारची छोटी छोटी साधने आज कारमध्ये खरोखर उपयुक्त आहेत. पूर्वी ती पाढऱ्या वा काळ्या रंगाच्या बुचासारख्या एका कॅपने काचेवर हवेच्या दाबाच्या सहाय्याने बसत होती. काही वेळाने हवेचा दाब कॅपमधून कमी अधिक झाला की ती बुच सनशेडला पाडून टाकत. मात्र ती पुन्हा काचेवर लावावी लागत आता त्या पद्धतीचीही सनशेड येतात व मॅग्नेटिक पद्धतीचीही येतात. ही मॅग्नेटिक पद्धतीची सनशेड नक्कीच उपयुक्त आहेत. तुम्हाला तुमच्या कारच्या मॉडेलनुसार त्या कारला असलेल्या काचेच्या व खिडकीच्या आकारानुसार मिळतात. खिडकीला आतील बाजूने अतिशय चपखलपणे बसतात व लोहचुंबकीय पट्टीमुळे कारच्या लोखंडी भागाला ती घट्ट बसतात. काळ्या रंगाच्या कापडाप्रमाणेच अन्य रंगाच्या वा प्रकारच्या कापडातही ती बनवता येतात. कापड वा सिंथेटिक प्रकारातही ती बाजारात उपलब्ध आहेत.
काळ्या फिल्म लावून कायदा मोडून सूर्यप्रकाशाच्या कडक किरणांपासून प्रवासात सावली देणारी ही साधने उपयोगाची नक्कीच आहेत.कारच्या बाजूच्या चारही काचांसाठी ती लावता येतात. बाहेरच्या बाजूने पाहाताना आतील व्यक्ती झटकन दिसत नाही. पडदा लावण्यापेक्षा हा प्रकार जास्त सुलभ व सोयीस्कर आहे. पुन्हा कारला मॅच होणारी रंगसंगती म्हणून काळ्या रंगातही ती चालून जातात. मॅग्नेटिक पट्टीचा वापर केल्याने सनशेड अधिकच उपयुक्त व सोयीची झालेली आहेत.