प्रदूषणावर मात्रा ‘भारत स्टेज ६’ची; पहिले इंजिन सादर, उत्सर्जन ६२ टक्के कमी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 02:53 AM2018-02-14T02:53:11+5:302018-02-14T02:53:13+5:30
दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे.
- चिन्मय काळे
नॉयडा : दरवर्षी सुमारे ३० लाख नवीन वाहने भारतीय रस्त्यांवर येतात. त्यामुळे प्रदूषण वाढत आहे. त्यावर‘भारत स्टेज ६’ (बीएस व्हीआय) हे इंजिन सुयोग्य ठरणार आहे. प्रदूषणावर मात करण्याच्या केंद्राच्या धोरणाला अनुसरून कंपन्यांनी विचारविनिमय सुरू केला आहे.
त्यासाठीच पर्यावरणानुकूल वाहने सादर करण्यात आली आहेत, पण ही वाहने ‘कन्सेप्ट’ स्तरावर आहेत. त्यामुळे पेट्रोल-डिझेल इंधनाच्या पारंपरिक इंजिनांचे प्रदूषण कमी होणे अत्यावश्यक आहे. यासाठीच ‘बीएस व्हीआय’ श्रेणी येणार आहे. हे इंजिन मर्सिडीज-बेन्झ कंपनीने सादर केले आहे.
केंद्र सरकारने बीएस व्हीआय श्रेणीतील डिझेल इंजिने एप्रिल २०२० पासून अनिवार्य केली आहेत. त्या आधीच मर्सिडीजने अशा इंजिनाची निर्मिती भारतात केली. या इंजिनाने सज्ज पहिली गाडी त्यांनी सादर केली. त्या निमित्ताने इंजिनही पाहायला मिळाले. प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वच कंपन्यांनी पुढाकार
घेतल्यास इलेक्ट्रिक वाहनांना आधी पारंपरिक इंधनाच्या गाड्याही उपयुक्त ठरतील, असे मत मर्सिडीज-बेन्झ इंडियाच्या व्यवस्थापकीय संचालकांनी सांगितले.
आॅटो उद्योगाला हव्यात सवलती
भारतीय आॅटो उद्योगाचा जीडीपीमध्ये सात ते साडे सात टक्के हिस्सा आहे. हा उद्योग जगात सातवा आहे. त्यात आणखी वाढ होण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी सरकारने करांमार्फत सवलत देणे गरजेचे आहे.
आॅटो कंपन्या रोजगार दुप्पट करण्यास सज्ज आहे. मात्र, सरकारी धोरण त्याला अनुसरून नाही. ‘मेक इन इंडिया’ला चालना देण्यासाठी करसवलती आवश्यक आहेत, असे आवाहन मर्सिडीजचे रोलँड फॉगर यांनी व्यक्त केले.