'तुला काहीच माहिती नाही'; टाटांचा अपमान करणाऱ्या 'फोर्ड'ना मुंबईला धाव घ्यावी लागलेली!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 02:19 PM2022-11-01T14:19:20+5:302022-11-01T14:21:18+5:30
रतन टाटा सिर्फ नाम ही काफी है! भारतासह अगदी जगभरातील लोकांना 'टाटा' हे नाव माहित नसेल असं होऊ शकत नाही. देशातील मोठे उद्योगपती म्हणून टाटा यांची ओळख असली तरी दानशूरतेसाठीही टाटांचं नाव जगभरात घेतलं जातं.
नवी दिल्ली-
रतन टाटा सिर्फ नाम ही काफी है! भारतासह अगदी जगभरातील लोकांना 'टाटा' हे नाव माहित नसेल असं होऊ शकत नाही. देशातील मोठे उद्योगपती म्हणून टाटा यांची ओळख असली तरी दानशूरतेसाठीही टाटांचं नाव जगभरात घेतलं जातं. उद्योग जगतात रतन टाटा यांनी नाव कमावलं असलं तरी त्यांनाही एकेकाळी अपमानास्पद वागणुकीला सामोरं जावं लागलं होतं. पण त्यांनी आपल्या अपमानाची अशी काही परतफेड केली की त्याचं उदाहरण आजही दिलं जातं. दिग्गज भारतीय उद्योगपती हर्ष गोएंका यांनी टाटांची हिच कहाणी ट्विटरवर शेअर केली आहे आणि हेच ट्विट वेगानं व्हायरल होत आहे.
हर्ष गोएंकांनी ट्विट केला व्हिडिओ
सुप्रसिद्ध उद्योगपती आणि आरपीजी एंटरप्रायझेसचे चेअरमन हर्ष गोएंका यांनी आपल्या ट्विटर हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात रतन टाटा यांनी फोर्ड कंपनीनं केलेल्या अपमानाची कशी परतफेड याची कहाणी सांगितली आहे. यात ९० च्या दशकात टाटा मोटर्सनं कसं आपलं कार डिव्हिजन विकण्यासाठी फोर्ड कंपनीशी चर्चा केली आणि फोर्ड कंपनीच्या मालकानं टाटा यांचा अपमान केला होता. यानंतर रतन टाटा यांनी कार डिव्हिजन विकण्याचा विचार रद्द केला आणि फोर्ड कंपनीला अशी अद्दल घडवली की ज्याची कल्पनाही कंपनीच्या मालकानं केली नव्हती.
अशी आहे संपूर्ण कहाणी...
"जेव्हा फोर्ड कंपनीकडून अपमानास्पद वागणूक मिळाली त्यावर रतन टाटा यांची प्रतिक्रिया", या कॅप्शननं हर्ष गोएंका यांनी व्हिडिओ शेअर केला आहे. ९० च्या दशकात रतन टाटा यांनी टाटा मोटर्सच्या अंतर्गत टाटा इंडिका कार लॉन्च केली होती. पण ही लॉन्चिंग फ्लॉप ठरली आणि परिस्थिती इतकी वाईट बनली की कार डिव्हिजन विकण्याचा निर्णय टाटा यांना घ्यावा लागला होता. यासाठी रतन टाटा यांनी १९९९ साली फोर्ड मोटर्सचे चेअरमन Bill Ford यांच्याशी चर्चा केली होती.
Ratan Tata’s response when he was humiliated by Ford 👏👏👏 pic.twitter.com/y51ywPlnfW
— Harsh Goenka (@hvgoenka) October 31, 2022
इथूनच खरी कहाणी सुरू झाली आणि त्यानंतर जे घडलं त्याचं उदाहरण आजही दिलं जातं. अमेरिकेत बिल फोर्ड यांनी टाटांसोबतच्या डिलची खिल्ली उडवली होती आणि अपमानही केला होता. "तुला काहीच माहित नाही. तू पॅसेंजर कार डिव्हिजन सुरूच कशाला केलं? मी जर ही डिल केली तर ते तुझ्यावर केलेले उपकार ठरतील", अशा अपमानास्पद वागणूक बिल फोर्ड यांनी रतन टाटांना दिली होती.
९ वर्षात टाटा मोटर्सनं गाठलं यशाचं शिखर
अमेरिकेत झालेल्या अपमानास्पद वागणुकीवर रतन टाटा यांनी त्यावेळी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. ते शांत राहिले. पण त्यांनी त्याच रात्री निर्णय घेतला की आता टाटा मोटर्स डिव्हिजन विकणार नाही आणि त्याच रात्री ते मुंबईत परतले. त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया न देता आपलं पूर्ण लक्ष टाटा मोटर्स कंपनी कशी मोठी करता येईल याकडे दिलं. टाटा यांच्या मेहनतीला यश मिळू लागलं आणि नऊ वर्षांनी म्हणजेच २००८ साली टाटा मोटर्सनं जगभरातील मार्केटमध्ये हातपाय पसरले.
बिल फोर्ड यांना मुंबईत यावं लागलं
टाटा मोटर्स कंपनी रतन टाटा यांच्या नेतृत्वात यशोशिखर गाठत असताना बिल बोर्ड यांच्या नेतृत्वाखालील फोर्ड मोटर्स कंपनीची परिस्थिती मात्र दिवसेंदिवस खालावत होती. आता बुडणाऱ्या फोर्ड कंपनीला संजीवनी देण्यासाठी रतन टाटा यांनी पुढाकार घेतला. यातूनच टाटा यांनी त्यांच्याशी झालेल्या अपमानास्पद वागणुकीची परतफेड केल्याचं बोललं जातं.
फोर्ड कंपनीला जेव्हा मोठं नुकसान सोसावं लागत होतं तेव्हाच टाटाचे चेअरमन रतन टाटा यांनी बिल फोर्ड यांना त्यांच्या लोकप्रिय ब्रँड जॅग्वार आणि लँड रोव्हर खरेदीची तयारी दाखवली. आता या डीलसाठी रतन टाटा यांना अमेरिकेत जावं लागलं नाही. तर त्यांचा अपमान करणाऱ्या बिल फोर्ड यांना स्वत: त्यांच्या संपूर्ण टीमसह मुंबईत यावं लागलं.
फोर्डचे चेअरमन म्हणाले... 'तुमचे आमच्यावर उपकार'
मुंबईत रतन टाटा यांनी ऑफर स्वीकारताच बिल फोर्ड यांचे सुरच बदलले. टाटा मोटर्सच्या कार डिव्हिजनच्या डीलवेळी फोर्ड यांनी रतन टाटांसाठी जे वाक्य म्हटलं होतं तेच वाक्य त्यांना स्वत:साठी म्हणण्याची वेळ आली. फोर्डचे चेअरमननं मीटिंगवेळी रतन टाटा यांचे आभार मानले आणि तुम्ही जॅग्वार आणि लँड रोवर ब्रँड खरेदी करुन आमच्यावर उपकार करत आहात, असं म्हटलं. जगात आज जॅग्वार आणि लँड रोवर कार टाटा मोटर्सच्या सर्वात यशस्वी कार मॉडल्सपैकी एक आहेत.