रतन टाटांच्या तरुण मित्राने खरेदी केली Tata Safari; टाटांनी कौतुकाने पाहिली शंतनुची गाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 07:02 PM2023-11-29T19:02:35+5:302023-11-29T19:03:40+5:30
रतन टाटांचे मॅनेजर शंतनू नायडूने नवीन टाटा सफारी खरेदी केली आणि सर्वात आधी आपल्या बॉसला दाखवली.
Ratan Tata Shantanu Naidu Tata Safari: भारतातील दिग्गज आणि सर्वात लोकप्रिय उद्योगपती रतन टाटा (Ratan Tata) यांचा तरुण मित्र शंतनू नायडू (Shantanu Naidu ) याने एक नवीन एसयूव्ही खरेदी केली आहे. आतापर्यंत टाटा नॅनोमध्ये प्रवास करणाऱ्या शंतनूने गेल्या महिन्यात टाटा मोटर्सचीच नवीन सफारी फेसलिफ्ट खरेदी केली. महत्त्वाची बाब म्हणजे, नवीन सफारी घेतल्यानंतर शंतनूने सर्वात आधी रतन टाटांना दाखवली.
सफारीचा टॉप एंड व्हेरियंट
रतन टाटांचे मॅनेजर आणि गुडफेलोचे संस्थापक शंतनू नायडूने नवीन टाटा सफारी फेसलिफ्टचे टॉप एंड व्हेरिएंट, अकम्प्लिश्ड प्लस खरेदी केले आहे, ज्याची किंमत 27 लाखांपेक्षा जास्त आहे. भारतातील नवीन सफारीची डिलिव्हरी घेणारा शंतनू हा पहिला ग्राहक आहे. रतन टाटा यांनी स्वतः कौतुकाने शंतनूच्या पहिल्या एसयुव्हीची पाहणी केली. विशेष म्हणजे, यापूर्वी शंतनू ‘रतन टाटांची ड्रीम कार’ टाटा नॅनो चालवत असत.
शंतनूच्या कंपनीत टाटांची गुंतवणूक
रतन टाटांचे व्यवस्थापक मानले जाणारे शंतनू नायडू त्यांच्यासोबत सावलीसारखे असतात. शंतनू आणि टाटांचे अनेक फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका फोटोमध्ये शंतनू स्वतःच्या हाताने टाटांना केक भरवताना दिसत आहेत. दरम्यान, रतन टाटा यांनी शंतनूच्या स्टार्टअप गुडफेलोजमध्ये गुंतवणूक केली आहे.
कोण आहे शंतनू नायडू?
30 वर्षीय शंतनू नायडूचा जन्म पुण्यात झाला आणि त्याने कॉर्नेल विद्यापीठातून एमबीएचे शिक्षण घेतले. टाटा समूहात महाव्यवस्थापक म्हणून काम करणारा शंतनू, रतन टाटांच्या अत्यंत जवळचा आहे. विशेष म्हणजे, रतन टाटा अनेकदा छोट्या-मोठ्या स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक करतात, त्यात शंतनूची मोठी भूमिका असते.