रतन टाटांच्या Nano Electric ची बातच लय भारी; जाणून घ्या किती आहे किंमत?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 05:36 PM2022-05-31T17:36:34+5:302022-05-31T17:36:51+5:30
रतन टाटा यांना नॅनोत पाहून प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत होता. त्यानंतर टाटा मोटर्स नॅनो इलेक्ट्रीक लॉन्च करणार असल्याचीही चर्चा सुरू झाली
भारतीय वाहन बाजारात टाटा नॅनोचा जवळपास ग्राहकांना विसर पडला आहे. परंतु अलीकडेच मुंबईच्या ताज हॉटेलसमोर नॅनो आली त्यानंतर ती माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनली आहे. कारण या नॅनो कारमध्ये खुद्द या कारचे जनक रतन टाटा(Ratan Tata) हजर होते. रतन टाटा हे त्यांचे खासगी स्वीय सहाय्यक शांतनु नायडूसोबत मॉडिफाइड टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारसह(Modified Tata Nano Electric) ताज हॉटेलमध्ये पोहचले होते.
रतन टाटा यांना नॅनोत पाहून प्रत्येक जण त्यांचे कौतुक करत होता. त्यानंतर टाटा मोटर्स नॅनो इलेक्ट्रीक लॉन्च करणार असल्याचीही चर्चा सुरू झाली. खरेच रतन टाटा कंपनीची नवी इलेक्ट्रीक कारचा प्रचार करण्यासाठी ताजला पोहचले होते का? असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. मात्र रतन टाटा इलेक्ट्रीक नॅनो कारमधून ताजला पोहचले खरे, परंतु ही इलेक्ट्रिक कार टाटा मोटर्सनं बनवली नव्हती. तर ही एक कस्टम मेड टाटा नॅनो इलेक्ट्रिक आहे. जी त्यांना इलेक्ट्रिक वाहन उत्पादन करणाऱ्या पावरट्रेन सॉल्यूशंस बनवणाऱ्या ElectraEV ने भेट दिली होती.
Electra EV ही रतन टाटा यांनीच सुरू केलेली कंपनी आहे. कोयंबटूरमध्ये मॅन्युफॅक्चरिंग सुविधेसह कंपनीचं मुख्यालय पुण्यात आहे. ELectra EV ने ६२४ सीसी पेट्रोल इंजिनसह Tata Nano कारला इलेक्ट्रिक कारमध्ये मॉडिफाय केले आहे. त्यात ७२व्ही पावरट्रेन दिले आहे. त्याचसोबत सुपर पॉलीमर लिथियम-ऑयन बॅटरी पॅकचा वापर करण्यात आला आहे. या मॉडिफाय टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची रेंज १५० ते १६० किमी असल्याचं सांगितले जाते. ही कार ०-६० किमी प्रतितास वेगाने अवघ्या १० सेकंदात वेग पकडण्यासाठी सक्षम आहे.
नोंदणी करण्याची शक्यता
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ElectraEV चे हे रेट्रोफिटिंग FAME अनुरूप आहे आणि ARAI आणि RTO प्रमाणित आहे. म्हणजेच तुम्ही त्याची नोंदणी देखील करू शकता. कंपनी सध्या फ्लीट विभागासाठी रिट्रोफिटिंग सेवेवर लक्ष केंद्रित करत आहे. ElectraEV द्वारे ऑफर केलेली इतर उत्पादने आणि सेवांमध्ये वाहन नियंत्रण युनिट्स, टेलिमॅटिक्स, प्रोटोटाइपिंग, होमोलोगेशन रेडिनेस आणि काही विक्रीनंतरच्या सेवा आणि उपायांचा समावेश आहे. टाटा नॅनो इलेक्ट्रिक कारची किंमत अद्याप स्पष्ट केली नाही. परंतु कदाचित अडीच ते ३ लाख रुपयांमध्ये ही कार असल्याचं सांगितले जात आहे.