एसयूव्हीला असलेली रेअर लॅडर अर्थात स्टीलची शिडी एक बहुपयोगी साधन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 06:00 PM2017-09-21T18:00:00+5:302017-09-21T18:00:00+5:30
वाहन उद्योगामध्ये अनेक प्रकारच्या साधनसामग्रीच्या निर्मितीचाही उद्योग महत्त्वाचा आहे. सर्वच साधने काही कार उत्पादक तयार करीत नाहीत. अर्थात या विविध प्रकारच्या साधनांचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे असेही नसते
वाहन उद्योगामध्ये अनेक प्रकारच्या साधनसामग्रीच्या निर्मितीचाही उद्योग महत्त्वाचा आहे. सर्वच साधने काही कार उत्पादक तयार करीत नाहीत. अर्थात या विविध प्रकारच्या साधनांचा वापर प्रत्येकाने केलाच पाहिजे असेही नसते. आरटीओच्या नियमांच्यादृष्टीने आवश्यक नियमांचे निकष पूर्ण केले की तुमची कार नियमानुसार रस्त्यावर तुम्ही चालवू शकता. मात्र तरीही तुमच्या विविध प्रकारच्या गरजा त्या कारमुळे पूर्ण होत नाहीत. त्यामध्ये असणा-या आवश्यकतेचा विचार प्रत्येक ग्राहक आपापल्या परीने करीत असतो, त्यासाठी साधनांचा शोध घेत असतो. त्यातूनच नवी साधने तयार होतात. नव्या कल्पना तयार होतात.
एसयूव्ही व एमयूव्ही यांचा वापर गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या प्रकारच्या कारना मागच्या बाजूला स्टीलची छोटीशी शिडी त्याला इंग्रजीमध्ये लॅडर असे म्हणतात, ती काही कंपन्यांनी दर्शनसौंदर्यासाठी लावली. मात्र त्या लॅडरचे महत्त्व काहींनी वेगवेगळ्या प्रकाराने अंमलात आणले व अतिरिक्त साधन म्हणून या प्रकारच्या शिड्या वा लॅडर एसयूव्हीला जोडले जाऊ लागले. विशेष करून स्टीलच्या लॅडरमुळे काहींनी त्या मागे वा त्या लॅडरला स्टेपनीसाठीही उपयोगात आणले. काहींनी रूपवरील कॅरियरवर सामान चढवताना सोपे व्हावे म्हणून काहीसे वर जाण्यासाठी या लॅडरचा वापर करण्यास सुरुवात केली.
बाजारामध्ये आज विविध कंपन्यांच्या या रेअर लॅडर्सची उपलब्धता आहे. स्टील कोटिंग पासून पूर्णपणे स्टीलचे वा क्रोम प्लेटेल लोखंडाचे किंवा पावडर कोटिंग असे लॅडर्स मिळतात. काही लोक तसे खास आवश्यक तसे आरेखन करून अधिक सुविधा करून ते बनवूनही घेतात. या लॅडरमुळे काहीवेळा काचेलाही एक संरक्षक आधार प्राप्त होतो. एसयूव्ही, एमयूव्ही, मिनीबस यासाठी लॅडर्स वापरले जातात. इतकेच नव्हे तर काही हॅचबॅकलाही काहींनी मोठ्या कौतुकाने आपल्याला आवडले म्हणून लहान आकारातील लॅडर तयार करून लावले आहेत.
एसयूव्हीसारखे लूक हॅचबॅकला देण्याचा प्रकारही काही करीत असतात. त्यातून हा लॅडरचा आकर्षक लूक लोकांना आवडतो तसा बनवलाही जातो. पूर्णपणे वेल्ड करून वापरले जातात, तसेच नटबोल्टवर वा फोल्डिंगमध्येही त्याचा वापर करण्याचे आरेखन केलेले दिसते. एकंदर उपयुक्ततेसाठी तयार केलेले हे लॅडर आता दर्शनीय म्हणूनही स्वीकारले गेले आहेत. ग्रामीण भागात याची क्रेझ विशेष दिसून येते.
लॅडर वा या प्रकारच्या शिड्या संकल्पनेची सुरुवात मूलतः बस, मिनी बस यासाठी झाली, मात्र कार डिझायनर्सनी आपल्या कल्पकतेतून आणखी काही वेगळे सादरीकरण करण्यासाठी या प्रकारच्या अनेक घटकांना जन्म दिला. अशा प्रकारच्या साधनांनी कारचे मूळ वजन वाढते, त्यामुळे काहीवेळा कारच्या समतोलावर व ड्रायव्हिंगवरही परिणाम होऊ शकतो. अर्थात या सा-या बाबी प्रत्येकजण गंभीरपणे घेतो असे नाही.
आरटीओ नियमांनुसार या अतिरिक्त साधनांचा वापर करण्यास बंदी नसली तरी काही बाबतीत त्यांची बंदी आहे. काही साधनांचा वापर करताना त्यावर निर्बंध आहेत. वाँरंटीमध्ये वाहन असताना, तर काहीवेळा अपघाताच्यावेळी विमा रक्कम देताना अतिरिक्त साधनांचा वापर योग्य की अयोग्य हे पाहिले जाते. तेव्हा अतिरिक्त साधने वापर करताना अशा बाजूही लक्षात घ्यायला हव्यात.