जुन्या वाहनांचीही बीएच सीरिजमध्ये करा नोंदणी; अध्यादेश जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 08:52 AM2022-12-17T08:52:38+5:302022-12-17T08:53:05+5:30
सरकारने २०२१मध्ये बीएच ही नवीन नोंदणी मालिका समाविष्ट केली. त्यात केवळ नवीन वाहनांचीच नोंदणी हाेत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : नोकरीत बदली किंवा व्यवसायानिमित्त वारंवार राज्य बदलणाऱ्या नागरिकांना वाहन नोंदणी सोयीची व्हावी यासाठी सरकारने बीएच (भारत) या नावाने मालिका सादर केली. आता बीएच सीरिज वाहन नोंदणी (रजिस्ट्रेशन मार्क) संबंधीच्या नियमांत दुरुस्ती केली आहे. त्यानुसार जुन्या वाहनांचीही बीएच सीरिजमध्ये नाेंदणी करता येणार आहे. याबाबत केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने नुकतीच अधिसूचना जारी केली आहे.
सरकारने २०२१मध्ये बीएच ही नवीन नोंदणी मालिका समाविष्ट केली. त्यात केवळ नवीन वाहनांचीच नोंदणी हाेत आहे. आता नियमित नोंदणी असलेल्या वाहनांनाही यामध्ये बदलता येणार आहे. ही नोंदणी ऐच्छिक असून, चार किंवा त्यापेक्षा अधिक राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील सरकारी कार्यालये अथवा खासगी संस्थांच्या कार्यालयांत काम करणाऱ्या नागरिकांसाठी सादर केली आहे.
बीएच सीरिजमध्ये झाले मोठे बदल
आता बीएच सीरिज रजिस्ट्रेशन मार्क गाड्यांची विक्री पात्र अथवा अपात्र व्यक्तीलाही केली जाऊ शकते.
ज्या गाड्यांची सामान्य नोंदणी आहे, त्यांनाही बीएच सीरिजमध्ये बदलले जाऊ शकते. त्यासाठी योग्य कर भरणा करावा लागेल.
लोक आपल्या घरून अथवा कार्यालयातून बीएच सिरीजसाठी अर्ज करू शकतील. यासाठी बदल प्रस्तावित आहे.
या सुविधेचा दुरुपयोग होऊ नये यासाठी खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांस वर्किंग सर्टिफिकेट द्यावे लागेल.
सरकारी कर्मचारी आपल्या आयकार्डसोबतच सेवा प्रमाणपत्राच्या (सर्व्हिस सर्टिफिकेट) आधारेही बीएच सिरीज नोंदणी करू शकतील.