Revolt RV1: येतेय नवी इलेक्ट्रीक बाईक, कमी किंमतीत मिळणार उत्तम ड्रायव्हिंग रेंज
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 03:35 PM2021-07-26T15:35:12+5:302021-07-26T15:40:27+5:30
सध्या Revolt Motors देशात दोन इलेक्ट्रिक बाईक्सची विक्री करत आहे. या बाईक्सना ग्राहकांकडूनही उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
देशाची प्रमुख इलेक्ट्रीक वाहन उत्पादक कंपनी Revolt Motors नं बाजारात दोन इलेक्ट्रीक दुचाकी लाँच केल्या आहेत. यामध्ये एन्ट्री लेव्हची RV 300 आणि RV400 यांचा समावेश आहे. आता कंपनी इलेक्ट्रीक बाईकचं आणखी एक नवं मॉडेल RV1 बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. या बाईकची किंमत सध्याच्या बाईकपेक्षा कमी असेल. तसंच याचं उत्पादन पुढील वर्षी जानेवारी महिन्यापासून केलं जाणार आहे.
Revolt RV1 ही बाईक संपूर्णपणे भारतीय बनावटीची असेल, तसंच हरयाणातील मानेसर येथील कंपनीच्या प्लांटमध्ये या बाईकचं उत्पादन केलं जाईल. मेड इन इंडिया असल्यानं या बाईकची किंमतही कमी असण्याची शक्यता आहे. दरम्यान कंपनी आपल्या काही पार्ट्सची आयात चीनहून करत होती. परंतू आता कंपनी पूर्णपणे भारतीय पार्ट्सवर लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न करत आहे.
RV300 होणार डिस्कंटिन्यू
कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार आता RV300 हे मॉडेल डिस्कंटिन्यू करण्यात येणार आहे. तसंच त्याच्या जागी कमी किंमतीच्या RV1 हे मॉडेल आणलं जाणार आहे. परंतु ही बाईक बाजारात कधीपर्यंत येईल याबाबत अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सध्या Revolt नं आगामी बाईकच्या तंत्रज्ञान आणि फीचर्सबद्दल तसंच ड्रायव्हिंग रेंजबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. दरम्यान, डॉमिनोझ पिझ्झा कंपनीनसाठी एन्ट्री लेव्ह मॉडेल RV300 इलेक्ट्रीक बाईक्सचं पूर्ण स्टॉक घेत असल्याची माहिती कंपनीनं रविवारी दिली होती. तसंच कंपनी याद्वारे आपल्या पेट्रोल गाड्यांना रिप्लेस करणार आहे.