रॉयल एनफील्डने फसविले; पिगासस 500 बाईक कचऱ्यात टाकल्या; कंपनी नरमली
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2018 12:15 PM2018-10-09T12:15:14+5:302018-10-09T12:23:09+5:30
गेल्या काही दिवसांपूर्वी रॉयल एनफील्डने काढलेल्या लिमिटेड एडिशन पिगासस 500 ला कचऱ्यात फेकण्यात आले होते. हा वाद आजही थांबल्याचे दिसत नाही. कारणही तसेच आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी रॉयल एनफील्डने काढलेल्या लिमिटेड एडिशन पिगासस 500 ला कचऱ्यात फेकण्यात आले होते. हा वाद आजही थांबल्याचे दिसत नाही. कारणही तसेच आहे. कंपनीने या नाराज ग्राहकांसमोर तीन पर्याय ठेवले आहेत. आता हे पर्याय हा वाद सोडवतात की वाढवतात हे येत्या काळात समजेलच. कशावरून झाला होता वाद?
रॉयल एनफिल्डने दुसऱ्या जागतीक महायुद्धामध्ये वापरली गेलेली एनफील्डनेच बनविलेली बाईक Flying Flea या बाईकला स्मरण करण्यासाठी नुकतेच लिमिटेड एडिशन काढले होते. यामध्ये जुन्या Flying Flea सारखाच बाईकचा रंग आणि अॅक्सेसरीजचा वापर केला होता. तसेच कंपनीने केवळ 250 बाईकचीच निर्मिती केली होती.
या बाईकचे नाव पिगासस 500 असे ठेवण्यात आले होते. या बाईकची किंमत 2.5 लाख ठेवण्यात आली होती. महत्वाचे म्हणजे ही बाईक ऑनलाईन बुकिंगद्वारे केवळ तीन मिनिटांत विकली गेली होती. एवढी मोठी किंमत मोजूनही या बाईकमध्ये एबीएस देण्यात आले नव्हते.
काही दिवसांतच रॉयल एनफिल्डने आणखी एक बाईक सिग्नल्स 350 लाँच केली. ही दिसायला हुबेहुब पिगासस 500 सारखीच आहे. मात्र या बाईकमध्ये एबीएस देण्यात आला असून किंमतीही एक लाख रुपयांनी कमी ठेवली आहे. यावरून पिगाससच्या ग्राहकामध्ये फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी निषेध म्हणून नवी कोरी पिगागस बाईक कचऱ्यात टाकून दिली.
जर कंपनीने दुसरी बाईक लाँच केली तर पिगाससला लिमिटेड एडिशन कसे म्हटले. कंपनीने परदेशात पिगाससची विक्री एबीएस प्रणाली बसवून केलेली असताना भारतीय ग्राहकांच्या जिवाशी का खेळली. कमी किंमतीत तिच बाईक वेगळ्या नावाने लाँच करून एनफिल्डने पिगाससच्या ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप या मालकांनी केला आहे.
हा वाद अंगाशी येणार असल्याचे दिसू लागताच कंपनीने या ग्राहकांना तीन पर्याय सुचविले आहेत. ग्राहकांनी ही बाईक कंपनीला परत केल्यास त्यांना त्यांची पूर्ण रक्कम परत मिळणार आहे. दुसऱ्या पर्यायात पिगाससच्या बदल्यात रॉयल एनफिल्ची दुसरी बाईक घ्यावी आणि कंपनी फरकाची रक्कम परत करेल. तर तिसऱ्या पर्यायामध्ये ग्राहकांना तीच बाईक ठेवायची असेल तर एक वर्षाची जादा वॉरंटी आणि दोन मोफत सर्व्हिस मिळणार आहेत.