कधी लॉन्च होणार Royal Enfield ची Electric Bullet; कंपनीच्या सीईओंनी केला मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 07:15 PM2023-08-04T19:15:38+5:302023-08-04T19:15:44+5:30
Royal Enfield Electric Bike: इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता अनेक कंपन्या या क्षेत्रात उतरत आहेत.
RE Electric Bike: भारतात इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच अनेक कंपन्या या सेगमेंटमध्ये आपल्या नवनवीन गाड्या लॉन्च करत आहेत. यातच आता भारतातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेल्या रॉयल एनफिल्डने या इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये उतरण्याची योजना आखली आहे. कंपनीने इलेक्ट्रिक बुलेट विकसित करण्याच्या दिशेने कामही सुरू केले आहे.
आयशर मोटर्स (रॉयल एनफिल्डची मूळ कंपनी) चे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सिद्धार्थ लाल यांच्या मते, कंपनी प्रोटोटाइपची चाचणी करत आहे. चाचणी संपवून इलेक्ट्रिक बुलेट मार्केटमध्ये येण्यासाठी दोन वर्षांचा कालावधी लागू शकतो. इलेक्ट्रिक टू-व्हीलर मार्केटमध्ये उतरण्यासाठी आणि इलेक्ट्रिक वाहनांसाठी पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी रॉयल एनफिल्डने सुमारे रु. 1,000 कोटी गुंतवण्याचे ठरवले आहे. ही गुंतवणूक 2023-24 या कालावधीत केली जाणार आहे. 1.5 लाख इलेक्ट्रिक युनिट्सची उत्पादन क्षमता गाठण्याचे कंपनीचे उद्दिष्ट आहे.
रॉयल एनफिल्डची विक्री
रॉयल एनफिल्डने गेल्या जुलैमध्ये एकूण 32 टक्के (वार्षिक आधारावर) वाढ केली असून, एकूण 73117 युनिट्सची विक्री केली. यामध्ये देशांतर्गत आणि निर्यातीचा समावेश आहे. कंपनीने देशांतर्गत बाजारात 42 टक्क्यांच्या वाढीसह 66062 युनिट्सची विक्री केली आहे. त्याच्या हंटर 350 बाइकला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.