तुम्हीही कार मॉडिफाय केलीय? RTO चा नियम पाहाच; अन्यथा भरावा लागेल मोठा दंड
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2022 05:19 PM2022-06-14T17:19:51+5:302022-06-14T17:20:35+5:30
तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकेल. पाहा, डिटेल्स...
नवी दिल्ली: भारतात वाहनांमध्ये आपल्या आवडीचे बदल करून घेण्याची मोठी क्रेझ आहे. मात्र, यातील बदलांमुळे सामाजिक नुकसान होण्याची शक्यता मोठी असते. यामुळे प्रादेशिक परिवहन कार्यालयाने यासंदर्भात महत्त्वाचे कायदे केले असून, या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना मोठा दंड तसेच शिक्षाही होऊ शकते. सुरक्षा आणि सुलभता यासाठी RTO आपल्या नियमांमध्ये वेळोवेळी बदल करत असतात. याचा फायदा प्रवाशांनाच होत असतो. मात्र, आता कार मॉडिफाय करणाऱ्यांनी आरटीओच्या या एका नियमाकडे लक्ष देणे आवश्यक आहे. अन्यथा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो.
सर्वांत आधी तुम्ही आरटीओचा नियम समजून घ्यायला हवा. प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (RTO) घालून दिलेल्या नियमांचे प्रत्येकाने पालन करणे गरजेचे आहे. तुम्ही या नियमांचे उल्लंघन केल्यास तुम्हाला चालान भरावे लागेल. हा नियम म्हणजे सन कंट्रोल फिल्मशी संबंधित आहे. मे २०१२ मध्ये, सर्वोच्च न्यायालयाने कारमध्ये टिंटेड ग्लासच्या, ब्लॅक फिल्म्सच्या वापरावर नियंत्रण आणणारा निर्णय दिला. त्यानंतर आरटीओने आपल्या नियमांत सुधारणा केली.
टिंटेड ग्लास वापरण्यास सक्त मनाई आहे
काही लोक त्यांच्या कारमध्ये असे काही बदल करतात (मॉडिफाय) की कारची खिडकी बंद असताना कोणतीही व्यक्ती बाहेरून आत पाहू शकणार नाही. मात्र आत बसलेल्या व्यक्ती बाहेरच्या सर्व गोष्टी पाहू शकतात. यासाठी काही जण टिंटेड ग्लास किंवा काचेवर ब्लॅक फिल्म लावतात. यामुळे कारच्या बाहेरून कारच्या आतमधलं काहीच दिसणार नाही. मात्र तुम्ही काचेच्या अगदी जवळ गेलात तर तुम्हाला कारमधल्या गोष्टी अंधूक अंधूक दिसतील. परंतु तुम्हाला माहिती आहे का कार अशा प्रकारे मॉडिफाय करणे किंवा त्यामध्ये फेरफार करणं कायद्याने गुन्हा आहे. गुन्ह्यांना आळा बसावा, वाहनांचा बेकायदेशीर वापर होऊ नये, वाहनांमध्ये कोणत्याही प्रकारची तस्करी होऊ नये यासाठी हा नियम बनवण्यात आला आहे. त्यामुळे परिवहन विभागाकडून कारमध्ये टिंटेड ग्लास वापरण्यास सक्त मनाई आहे आणि ते बेकायदेशीर आहे. असे केल्यास तुम्हाला मोठे चालान भरावे लागू शकते किंवा तुरुंगातही जावे लागू शकते.
दरम्यान, आरटीओच्या नियमानुसार जर तुम्ही तुमच्या कारच्या विंडोवर (खिडकीच्या काचेवर) सन कंट्रोल फिल्म लावण्याचा प्रयत्न केला किंवा टिंटेड ग्लासचा वापर केला तर तुम्हाला मोठा दंड होऊ शकतो. तसेच या कायद्यात शिक्षेची तरतूद देखील करण्यात आली आहे.