OLAच्या मीटिंगमध्ये गोंधळ; मालकाने फाईल फाडली, कर्मचाऱ्यांना Useless म्हटले, नेमकं झालं काय..?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 02:41 PM2022-10-19T14:41:32+5:302022-10-19T14:43:57+5:30
ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची व्यवस्थापन शैली ओला इलेक्ट्रिकसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
Ola Co-Founder: ओलाचे सह-संस्थापक भाविश अग्रवाल यांची व्यवस्थापन शैली ओला इलेक्ट्रिकचे व्यवस्थापक आणि बोर्ड सदस्यांसाठी चिंतेचा विषय बनली आहे. नुकत्याच झालेल्या एका मीटिंगमध्ये भाविश अग्रवाल आपल्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड संतापल्याची घटना घडली. तसेच, त्यांनी फाईल फाडून आपल्या टीमला निरुपयोगी(Useless) म्हटले. एका रिपोर्टमधून हा खुलासा करण्यात आला आहे.
बैठकीत सीईओ भडकले
बिझनेस टुडेने ब्लूमबर्गच्या रिपोर्टच्या हवाल्याने ही माहिती दिली. कंपनीच्या दुचाकी विक्रीत घट झाल्यामुळे सीईओ खूप संतापले. रिपोर्टमध्ये ओला इलेक्ट्रिकच्या सुमारे दोन डझन माजी आणि सध्याच्या कर्मचाऱ्यांच्या मुलाखतींचा समावेश करण्यात आला आहे. आता ताजे प्रकरण म्हणजे, भाविश अग्रवाल यांची ओला इलेक्ट्रिकच्या टीमसोबतची बैठक झाली. या सभेत त्यांना इतका राग आला की, त्यांनी कर्मचाऱ्यांना सडकून काढले.
पंजाबी भाषेत सुनावले खडे बोल
ब्लूमबर्गच्या म्हणण्यानुसार, मीटिंगदरम्यान प्रेझेंटेशन फाइलमधील एक पेपर गहाळ झाल्यामुळे भाविश अग्रवाल यांनी सर्व पेपर फाडले आणि पंजाबी भाषेत आपल्या टीमला फटकारताना निरुपयोगी म्हटले. साधारणतः तासभर चालणारी बैठक त्यांनी अवघ्या काही मिनिटांत संपवली. कंपनीमध्ये कामाचे वातावरण आता 2013प्रमाणे राहिलेले नाही, असे काही कर्मचाऱ्यांनी म्हटले.
कर्मचाऱ्याला कारखान्याच्या चकरा मारायला लावल्या
रिपोर्टनुसार, कंपनीच्या माजी आणि वर्तमान कर्मचार्यांनी सांगितले की, भाविश अग्रवाल यांचे वर्तन दिवसेंदिवस उद्धट होत आहे. एका ताज्या प्रकरणात, त्यांनी एका कर्मचाऱ्याला चुकीची मोठी शिक्षा दिली. भाविश अग्रवालने एका कर्मचाऱ्याला कैक एकरमध्ये पसरलेल्या इलेक्ट्रिक टू-व्हीलर प्लांटमध्ये तीन फेऱ्या मारण्याची शिक्षा दिली. या कर्मचाऱ्याचा दोष एवढाच होता की, त्याने कंपनीचे मुख्य गेट उघडे ठेवले होते.