विभाजक नसणाऱ्या रस्त्यांवर ओव्हरटेक करताना अतिशय सावधान राहाणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 02:59 PM2017-08-24T14:59:30+5:302017-08-24T15:01:26+5:30
ओव्हरटेक ही अतिशय महत्त्वाची कृती आहे. विशेष करून विभाजक रहीत रस्त्यावर ओव्हरटेक करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.
ओव्हरटेक करणे ही एक सहजसोपी कृती आहे, असे मानून काही वाहनचालक अतिशय बेदरकारपणे ते काम करीत असतात. यामुळे त्यांना व अन्य वाहनांनाही धोका असतो, त्यातून समोरच्या वा अन्य वाहनांच्या चालकांना अतिशय सावध होत वाहन नियंत्रित करावे लागते. भारतात विभाजक नसलेल्या रस्त्यांवर ओव्हरटेक करताना विशिष्ट पद्धतीने ओव्हरटेक करावी लागते. तसेच एक्स्प्रेस वे सारख्या विभाजक असलेल्या मार्गावरही ओव्हरटेक करताना काही वेगळी काळजी घेऊन ते काम करावे लागते. विभाजक नसलेल्या मार्गाची आज नव्या पिढीतील चालकांना फार माहिती आहे असे दिसत नाही. दोन्ही हे मार्ग वेगळ्या रचनेचे आहेत, हे लक्षात घ्यायला हवे. विभाजक नसलेल्या मार्गावर ओव्हरटेक करताना अनेक धोके लक्षात घ्यावे लागतात, ते न घेतल्यास अपघाताची अधिक शक्यता असते. विभाजक नसलेल्या या मार्गावर ओव्हरटेक कशी करावी, का करावी, त्यासाठी कोणती काळजी घ्यावी, हे पाहाण्यासारखे आहे. बहुतांशी रस्ते हे विभाजक नसलेले असल्याने या प्रकारच्या रस्त्यावर अधिक काळजीपूर्वक ओव्हरटेक करणे गरजेचे आहे.
चारचाकी वाहने या रस्त्यावर आणण्यापूर्वी प्रथम आपल्या कारचे वा वाहनाचे बाहेरच्या अंगाला असलेले दोन्ही आरसे व्यवस्थित जुळवून घ्यावेत, मागील वाहनाचा अंदाज त्यात नीट येत आहे की, नाही ते पाहावे. त्याचप्रमाणे कारमध्ये आतील बाजूस आरसा ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला कारच्या मधे व पुढील काचेला लागून बसवलेला असतो. तो आरसाही नीट जुळवून म्हणजे अॅडजेस्ट करून घ्यावा. ओव्हरटेक करताना आपण ज्या वाहनाला ओव्हरटेक करणार आहोत, त्या वाहनाच्या चालकाला त्याची कल्पना द्यावी, त्याला अप्पर डिप्पर लाईट मारून वा हॉर्न वाजवून ती कल्पना द्यावी. त्याचप्रमाणे प्रत्यक्षात ओव्हरटेक करताना पुढील बाजूने कोणतेही वाहन येत नाही याची खात्री करीत व आपल्या मागे वाहन असेल तर ते पाहून व त्यानुसार त्या वाहनाला आपण ओव्हरटेक करणार असल्याने डाव्या बाजूला येत असल्याचा साईड इंडिकेटर द्यावा.
पुढील वाहनाची गती लक्षात घेऊन मग त्या वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी आपले वाहन उजव्या घेत व मागील वाहनाला साईड इंडिकेटरने तसा संकेत देत व पुढील वाहनाला ओव्हरटेक करण्यासाठी आपली कार उजव्याबाजूला हळूवारपणे घेत, गतीवर नियंत्रण राखीत व समोरून वाहन येत नसल्याची खात्री करीत ओव्हरटेक करावी. त्यानंतर आपले वाहन ज्या वाहनाला ओव्हरटेक करीत आहे, त्या वाहनाच्या पुढे त्याच्या रांगेत आपण येत आहोत, यासाठी साइड इंडिकेटरचा (डाव्या बाजूचा) संकेत देत आपल्या वाहनाची गती ओव्हरटेक ज्या वाहनाला करणार आहोत, त्यापेक्षा जास्त असली पाहिजे, हे भान राखीत आपल्या कारच्या वा वाहनाच्या डाव्या अंगाला असलेल्या आरशात ओव्हरटेक केलेल्या वाहनाचा व त्याच्या गतीचा अंदाज घेत त्या वाहनाच्या पुढे त्या वाहनाच्या रांगेत हळूवारपणे यावे. मागील वाहनाला त्याची गती कमी न करता आपण आपला वेग त्यापेक्षा जास्त राखीत आपल्या दिशेच्या योग्य रांगेत यावे व त्यानंतर साईड इडिकेटर बंद करावा. सर्वसाधारणपमे ओव्हरटेक करताना ओव्हरटेक ज्या वाहनाला करणार आहोत, ते वाहन आपल्या आरशात पूर्णपणे दिसले पाहिजे, त्यानंतरच त्या वाहनाच्या पुढे आपल्या दिशेच्या रांगेत पुन्हा यावे. हे करीत असताना, समोरून येणारे वाहन वा वाहने यांचा अंदाज घ्यावा. उजव्या बाजूला जाताना रस्त्याच्या बाजूचा अंदाज घ्यावा तसेच ओव्हरटेक केल्यानंतर डाव्या बाजूला वाहन घेतानाही त्यावेळी रस्त्याच्या डाव्या बाजूचा अंदाज घ्यावा. आपण रस्ता सोडून वाहन नेत नाही ना, याची काळजी घ्यावी. आपल्या दिशेची असणारी रांग मोडून विनाकारण समोरून येणाऱ्या वाहनाच्या रांगेत आपली कार घसवू नये.