सुसाट पळणार ई-वाहनांची विक्री; दुचाकी- तीनचाकी वाहनांच्या किंमती कमी होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 05:40 AM2022-09-16T05:40:50+5:302022-09-16T05:41:40+5:30
एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा वाटा १०-१५ टक्के असेल, चार्जिंग सुविधेमुळे ई-वाहनांत वाढ होईल
मुंबई : सरकार पर्यावरणपूरक म्हणून इलेक्ट्रिक वाहनांसाठी मोठ्या प्रोत्साहन देत आहे. त्यामुळे २०३० पर्यंत देशांतर्गत इलेक्ट्रिक वाहन उद्योगात दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची विक्री वेगाने वाढण्याची अपेक्षा असून, एकूण विक्रीत इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचा वाटा अनुक्रमे ५० आणि ७० टक्के असेल, असे एका अहवालात म्हटले आहे.
असोसिएशन ऑफ ऑटो पार्ट्स मॅन्युफॅक्चरर्स (एसीएमए) आणि मॅकिन्से यांनी संयुक्तपणे तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे की, देशात प्रवासी किंवा अवजड व्यावसायिक वाहनांपेक्षा विजेवर चालणाऱ्या दुचाकी आणि तीनचाकी वाहनांची एकूण किंमत कमी होण्याची शक्यता असून, याकडे ग्राहकांचे आकर्षण वाढले आहे. अहवालानुसार, २०३० पर्यंत, एकूण वाहन विक्रीत इलेक्ट्रिक प्रवासी वाहनांचा वाटा १०-१५ टक्के असेल आणि अवजड व्यावसायिक वाहनांचा वाटा पाच ते १० टक्के असेल. चार्जिंग सुविधेमुळे ई-वाहनांत वाढ होईल.
अति घाई टाळा... : इलेक्ट्रिक वाहनांची चाचणी करण्यासाठी कठोर प्रोटोकॉलचे पालन करणे आवश्यक आहे. आगीच्या घटना टाळण्यासाठी कंपन्यांनी अति घाई टाळावी, असे वाहन उद्योगातील दिग्गजांनी म्हटले आहे.
दिग्गज काय म्हणतात...
इलेक्ट्रिक वाहने अजूनही विकसित होत आहेत. उत्पादक शिकण्याच्या प्रक्रियेत आहेत आणि इलेक्ट्रिक वाहनाला आग लागणार नाही याची खात्री करण्यासाठी कोणत्या चाचण्या करायच्या हे देखील अद्याप समजलेले नाही. अशाच घटना १५-२० वर्षांपूर्वी होत होत्या. त्या वेळी आम्हाला काय करावे लागेल हे माहीत नव्हते, असे महिंद्राचे माजी व्यवस्थापकीय संचालक पवन गोयंका म्हणाले.
दुचाकी वाहने १००% इलेक्ट्रिक करा : कांत
भारतातील दुचाकी आणि तीनचाकी वाहने पुढील चार वर्षांत १०० टक्के इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे, असे निती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी म्हटले आहे. हरित वाहन क्रांती खरोखरच आपले दार ठोठावत आहे, असे ते म्हणाले.
स्वस्त कार वापरणाऱ्यांचा विचार करा : गडकरी
वाहन उत्पादक सहा एअरबॅग असलेल्या कारची निर्यात करत आहेत, त्यांनी भारतातही कारसाठी अशा सुरक्षा नियमांचा अवलंब करणे आवश्यक आहे. लहान स्वस्त कार वापरणाऱ्या लोकांच्या सुरक्षेचाही उत्पादकांनी विचार करायला हवा, असे मंत्री गडकरी म्हणाले.