व्हीआयपी नंबरचा स्वॅग, स्कूटी खरेदीसाठी खर्च केले 16.15 लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2022 01:24 PM2022-04-18T13:24:38+5:302022-04-18T13:26:22+5:30
scooty vip number : मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅन्सी नंबर प्लेटवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीचे नाव बृज मोहन आहे.
नवी दिल्ली : चंडीगडमध्ये एका व्यक्तीने स्कूटी घेण्यासाठी तब्बल 16.15 लाख रुपये खर्च केले आहेत. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्च वाटले असेल. आता तुम्ही विचार करत असाल की अशी स्कूटी कोणत्या व्यक्तीने घेतली आहे, ज्याची किंमत इतकी जास्त आहे. दरम्यान, या व्यक्तीने 71,000 रुपयांची होंडा अॅक्टिव्हा (Honda Activa) स्कूटी खरेदी केली , परंतु या स्कूटीला फॅन्सी नंबर मिळवण्यासाठी 15.44 लाख रुपये खर्च केले. अशा प्रकारे ही स्कूटी त्यांनी एकूण 16.15 लाख रुपयांना पडली.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, फॅन्सी नंबर प्लेटवर लाखो रुपये खर्च करणाऱ्या व्यक्तीचे नाव बृज मोहन आहे. बृज मोहन हे सेक्टर 23 मध्ये राहतात आणि जाहिरात व्यावसायिक आहेत. CH01-CJ-0001 या नंबरसाठी त्यांनी एवढी मोठी रक्कम खर्च केली आहे. सध्या नुकत्याच खरेदी केलेल्या स्कूटीसाठी ही नंबर प्लेट वापरणार आहे, असे बृज मोहन यांनी सांगितले. पण अखेरीस ते त्यांच्या कारसाठी वापरणार असल्याचे म्हटले जात आहे.
फॅन्सी नंबरच्या लिलावादरम्यान, CH01-CJ-0001 सर्वात जास्त 15.44 लाख रुपयांना विकला गेला तर या नंबरची रिझर्व्ह किंमत फक्त 50,000 रुपये होती. दुसरीकडे, CH-01-CJ-002 हा नंबर 5.4 लाख रुपयांना विकला गेला. तसेच, CH-01- CJ-007 नंबरचा लिलाव 4.4 लाख रुपयांना झाला तर CH-01- CJ-003 नंबरचा 4.2 लाख रुपयांना लिलाव झाला.
व्हीआयपी नंबर्सबाबत माहिती..
राज्य परिवहन विभागाकडून प्रत्येक सिरीजमध्ये 0001 आणि 9999 दरम्यान अनेक नंबर्संना VIP नंबर्स म्हणून चिन्हांकित केले जातात. हे नंबर्स सामान्य नोंदणी प्रक्रियेद्वारे मिळत नाहीत. परिवहन विभाग सर्व उपलब्ध व्हीआयपी नंबर्सची यादी जाहीर करते. या नंबर्ससाठी बोली लावून लोक विकत घेऊ शकतात.