Maruti suzuki Price Hike: सेकंड हँड कार विकणाऱ्यांना फायदाच फायदा; मारुतीने कारच्या किंमती वाढविल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: January 16, 2023 11:38 AM2023-01-16T11:38:16+5:302023-01-16T11:38:40+5:30
मारुती सुझुकीने अद्याप कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.
देशातील सर्वात मोठी कार कंपनी मारुती सुझुकीने (Maruti Suzuki) आज त्यांच्या ताफ्यातील सर्वच कारच्या किंमतीमध्ये वाढ करत असल्याची घोषणा केली. यामुळे नवीन कार घेणाऱ्यांना खिसा खाली करावा लागणार आहे, तर जे लोक जुन्या मारुतीच्या कार विकण्याच्या विचारात आहेत, त्यांचा जबरदस्त फायदा होणार आहे.
मारुतीने सर्व मॉडेलच्या एक्स शोरुम किंमतींमध्ये 1.1 टक्क्यांची वाढ केली आहे. या नव्या किंमती आजपासूनच म्हणजेच १६ जानेवीपासूनच लागू होणार आहेत. दरवाढ ही वेगवेगळ्या मॉडेलसाठी वेगवेगळी असणार आहे.
मारुती सुझुकीने अद्याप कोणत्या मॉडेलची किंमत किती वाढवली जाणार आहे, याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. हे वेगवेगळ्या मॉडेल्सवर अवलंबून असले तरी कंपनीच्या वाहन लाइनअपमध्ये सध्या सर्वात स्वस्त अल्टो ते सर्वात महागडी ग्रँड विटारा या वाहनांचा समावेश आहे. मारुती सुझुकी व्यतिरिक्त, टाटा मोटर्स, ह्युंदाई, ऑडी आणि मर्सिडीज बेंझ या ब्रँडनेही जानेवारी महिन्यापासून त्यांच्या वाहनांच्या किमती वाढविल्या आहेत.
वाहन कंपन्यांनी इनपुट कॉस्टमध्ये वाढ झाल्याचे सांगितले होते. गेल्या दोन वर्षांपासून कंपन्या मोठ्या प्रमाणावर वाहनांच्या किंमती वाढवत आहेत. सेमीकंडक्टरचा पुरवठा, पुरवठा साखळी, इंधन दरवाढ, पगारवाढ, महागाई आदी कारणेही वाहनांच्या किमतीत वाढ होण्याचे प्रमुख कारण आहेत. याचा फटका मात्र ग्राहकांना बसत आहे. यामुळे जे कार घेण्याच्या विचारात आहेत, ते देखील किंमती पाहून नाक मुरडत आहेत. तरी देखील २०२२ मध्ये कंपन्यांनी चांगली विक्री नोंदविली आहे.