दीड लाखांत ५०१ किमीची रेंज देणारी EV मोटरसायकल दाखवा; Ola Roadster सिरीज लाँच
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:10 IST2025-02-05T12:08:22+5:302025-02-05T12:10:04+5:30
Ola Roadster Launched news: ओलाच्या एस१ प्रो जेन ३ स्कूटर गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आल्या आहेत. आज ओलाने रोडस्टर सिरीज लाँच केली आहे.

दीड लाखांत ५०१ किमीची रेंज देणारी EV मोटरसायकल दाखवा; Ola Roadster सिरीज लाँच
ओलाने मोठा धमाका केला आहे. ईलेक्ट्रीक स्कूटरचे जेन ३ मॉडेल्स लाँच केल्यानंतर आता मोटरसायकल बाजारातही कमी किंमत आणि जास्त रेंज देत दोन्ही प्रकारात आपणच बादशाह असल्याचा दावा केला आहे. महत्वाची बाब म्हणजे ओलाची ही मोटरसायकल ७० हजार रुपयांपासून (एक्स शोरुम) सुरुवात होते, ती दीड लाखांवर जाते. या दीड लाखांच्या बाईकची रेंज ओलाने ५०१ किमी असल्याचे सांगितले आहे.
ओलाच्या एस१ प्रो जेन ३ स्कूटर गेल्याच आठवड्यात लाँच करण्यात आल्या आहेत. आज ओलाने रोडस्टर सिरीज लाँच केली आहे. वजन आणि खर्च कमी करण्यासाठी ओलाने वायरिंगचे वजन ४ किलोवरून केवळ ८०० ग्रॅमवर आणले आहे. यासाठी कॉम्प्युटरमध्ये वापरत असलेली फ्लॅट केबल बनविण्यात आली आहे.
ओला रोडस्टर एक्सची किंमत बॅटरी पॅकनुसार ७४ हजार रुपयांपासून सुरुवात होत आहे. तर Roadster X+ ची किंमत १,०४ लाखांपासून सुरु होते. यामध्ये ओलाने ४ किलोवॉट आणि ९ किलो वॉटचे बॅटरी पॅक दिले आहे. याची रेंज २५२ किमी आणि ५०१ किमी असल्याचा दावा करण्यात आला आहे. या ५०१ किमीच्या रेंजच्या बाईकची किंमत १.५४ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
या इंट्रॉडक्टरी किंमती असून ही ५०१ किमीची रेंज असलेली मोटरसायकल १.६९ रुपये किंमतीची आहे. सर्व बाईकच्या मूळ किंमतीत १५००० रुपयांची कपात करण्यात आली आहे. रोडस्टर एक्स ही २.५, ३.५ आणि ४.५ किलो वॉट बॅटरी पॅकमध्ये उपलब्ध होणार आहे.
भाविश अग्रवाल यांचे दावे काय...
या रेंजवरून ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दीड लाखांत ५०१ किमीची रेंज देणारी मोटरसायकल शोधून दाखवा असे आव्हान दिले आहे. तसेच इतर कंपन्या जेन १ ला अद्याप मागे टाकू शकलेल्या नाहीत, आपण जेन ३ देत आहोत. १२५ सीसीच्या पेट्रोल बाईकच्या किंमतीत ईलेक्ट्रीक मोटरसायकल देत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जेन १ मध्ये जे वायरिंग आणि कनेक्टर होते त्यामुळे या स्कूटरना समस्या येत होत्या, त्या आता दूर करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भारत सेल देखील या मोटरसायकलमध्ये भविष्यात वापरला जाणार असल्याचे ते म्हणाले.