सर्वात वजनदार 'सिंपल वन' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच, फुल चार्जमध्ये धावेल 212 किमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2023 07:33 PM2023-05-23T19:33:49+5:302023-05-23T19:34:10+5:30
Simple One Electric Scooter : कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत, त्यानंतर ती बाजारात दाखल झाली आहे.
सिंपल एनर्जीने अखेर 'One' इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केली आहे. लेटेस्ट इलेक्ट्रिक स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 1.45 लाख रुपये आहे. सिंपल वन 15 ऑगस्ट 2021 रोजी सादर करण्यात आला. म्हणजेच दीड वर्षांहून अधिक काळ प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर लॉन्च करण्यात आली आहे. कंपनीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये अनेक सुधारणा केल्या आहेत, त्यानंतर ती बाजारात दाखल झाली आहे.
सिंपल वनच्या लाँच झाल्यापासून आतापर्यंत एक लाखाहून अधिक बुकिंग झाले आहेत. देशभरातील लोकांना ही इलेक्ट्रिक स्कूटर खूप आवडल्याचे या आकडेवारीवरून दिसून येते. सिंपल एनर्जी सर्वात आधी प्री-बुक ऑर्डर्सची डिलिव्हरी करणार आहे. इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी बंगळुरू येथून 6 जूनपासून सुरू होईल. कंपनी टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक स्कूटरची डिलिव्हरी करणार आहे.
परफॉर्मेंसबद्दल बोलायचे तर, सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये ड्युअल-बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. यामध्ये एक फिक्स बॅटरी आहे तर दुसरी रिम्यूव्हेबल आहे. बॅटरी पॅकची एकूण क्षमता 5kWh आहे. इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये वापरली जाणारी ही सर्वात पॉवरफूल बॅटरी असण्याची शक्यता आहे. एवढ्या पॉवरसह, सिंपल वन स्कूटकर फुल चार्ज झाल्यावर 212 किमी अंतर कापू शकते. घरात बॅटरी पॅक 5 तास 54 मिनिटांत 0 ते 80 टक्के चार्ज होऊ शकतो.
जर तुम्हाला 750 पोर्टेबल फास्ट चार्जर घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला 13,000 रुपये वेगळे द्यावे लागतील. या स्कूटरमध्ये 7-इंचाचा टचस्क्रीन इंटरफेस आहे, जो कनेक्टिव्हिटी आणि सर्व स्मार्ट फीचर्सना सपोर्ट करेल. याशिवाय बॅटरी पॅकशी संबंधित माहितीही मिळेल. नवीन इलेक्ट्रिक स्कूटर सहा कलरच्या ऑप्शनसह येतो. यामध्ये ब्रॅझन ब्लॅक, नम्मा रेड, एज्यूर ब्लू, ग्रेस व्हाइट आणि दोन स्पेशल कलर ब्रेजन एक्स आणि लाइट एक्स असतील.
सर्वात वजनदार इलेक्ट्रिक स्कूटर
सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर मल्टिपल राइडिंग मोडसह लाँच करण्यात आली आहे. यात इको, राइड, डॅश आणि सोनिक राइड मोड मिळतील. सोनिक मोडमध्ये सिंपल वन इलेक्ट्रिक स्कूटर फक्त 2.77 सेकंदात 0-40km/h चा स्पीड घेऊ शकते. या सेगमेंटमधील ही सर्वात वेगवान इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरचे वजन (कर्ब वेट) 134kg आहे, म्हणजेच ही कदाचित भारतात विकली जाणारी सर्वात वजनदार इलेक्ट्रिक स्कूटर आहे.