वाहनचालनासाठी हवे संयमी कौशल्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 4, 2017 01:49 PM2017-08-04T13:49:47+5:302017-08-04T13:50:52+5:30

ड्रायव्हिंग येणे म्हणजे केवळ गाडीची तांत्रिकता ज्ञात असणे इतके मर्यादित नाही त्या कौशल्याबरोबर शांतवृत्ती, सहनशीलता व संयम हवा. तरच ते खरे ड्रायव्हिंग स्कील ठरेल.

Spartan skills needed for driving | वाहनचालनासाठी हवे संयमी कौशल्य

वाहनचालनासाठी हवे संयमी कौशल्य

Next

वानचालकांची कमतरता हा भारतातील गंभीर विषय आहे. त्याचप्रमाणे वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्या वाहन चालकांची कमतरता हा देखील तितकाच गंभीर विषय आहे. पण याबाबत केवळ सरकारने नव्हे तर ज्याला ड्रायव्हिंग येते व ज्यांना ड्रायव्हिंग करायचे आहे,  त्या प्रत्येकानेच पुढाकार घ्यायला हवा. वाहतुकीचे नियम फारसे लक्षात न राहाण्या इतके कठीण नाहीत. परंतु जरा कुठे पुढे असलेली मोटार थांबली की मागच्या चालकाची चुळबूळ सुरू होते. काही वेळातच तो आपली कार असो की मोटारसायकल, ट्रक, टेंपो असो की मिनीबस वा बस, ती पुढे काढण्यासाठी आटापिटा सुरू करतो. मुंबई - गोवा या सारख्यया दुहेरी व विभाजक नसलेल्या महामार्गावर तर यामुळे अशाच प्रकारच्या वाहनचालकांच्या आट्यापिट्यामुळे वाहतूक कोंडी होत असते. परंतु या साऱ्या प्रकाराबद्दल अनेकदा आपण दुसऱ्याला दोष देतो. चूकही आपणच करतो व खापर रस्त्यामध्ये वाढलेली वाहनांची संख्या, खराब रस्ते, वाहतूक पोलीस विभागाचे दुर्लक्ष, मार्गावर असलेल्या गावांमध्ये लोक फार बेशिस्त आहेत, आठवडी बाजारही कसा वाहतूक कोंडीचे कारण असतो व अखेरीस सरकारचा दोष... अशा साऱ्या वर्तनातून आपण खरेच काय साधत असतो, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. या कारणांमध्ये आपण प्रत्येक कारणीभूत असतो. 
प्रवासाच्या वेळेमध्ये वाया जाणाऱ्या काळाबद्दल मानसिक त्रास करून घेताना संयम बाळगायलाही शिकायला हवे. त्रागा करून घेतल्याने वाहनचालनावर परिणाम होत असतो. उतावळेपण वाढत असते. पण ते टाळणे आपल्याच हाती असते. वाहन चालवणे ही कला आहे, पण वाहन चालवताना सहनशक्ती वाढवणे, संयम ठेवणे, वाहतुकीच्या नियमांचे पालन करणे, आपले वाहन व दुसऱ्याचा जीव सुरक्षित राहील असे वागणे ही या ड्रायव्हिंगच्या कौशल्याला आवश्यक व अपरिहार्य असणारी जोड आहे. हा 'जोडीदार' असल्याशिवाय कौशल्य कामाचे नाही, हे आवर्जून लक्षात ठेवायला हवे. वाहनांची संख्या, विशिष्ट दिवसांमध्ये असणारा रस्ते वाहतुकीतील ताण ही यानंतरच्या काळातील अविभाज्य अशी वाहतूक व्यवस्था असणार आहे. त्यामुळेच वाहन , वाहनचालनाचे शिक्षण, पुन्हा पुन्हा रिव्हॅम्प करण्याचीही गरज असणार आहे. आता गणपती उत्सवाच्या काळात कोकणात, देशावर जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढणार आहे तेव्हा ड्रायव्हिंगचा कस कसा लावायचा हे सर्व वाहनचालकांवर अवलंबून असणार आहे. भारतात तब्बल २२ लाख वाहनचालकांची कमतरता आहे असे विधान केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच केले आहे. पण सध्याची वाहनचालकांच्या कौशल्याची स्थिती पाहाता, चालकांच्या कौशल्याला नव्याने उजाळा देण्याचीही गरज वाटते.

Web Title: Spartan skills needed for driving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.