स्टार्ट द स्कूटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 05:00 PM2017-08-01T17:00:42+5:302017-08-01T17:00:47+5:30

स्कूटरचा नित्य वापर, कीकने स्टार्ट करण्याची सवय, यामुळे बॅटरी व एकूण स्कूटरच्या कार्यावर चांगला परिणाम पडत असतो.

Start the scooter | स्टार्ट द स्कूटर

स्टार्ट द स्कूटर

Next

सध्याच्या स्कूटर्स या ऑटोगीयर पद्धतीच्या, सेल्फस्टार्टला वाव देणाऱ्या आहेत. पूर्वीच्या स्कूटर्स या प्रामुख्याने हाताने गीयर टाकण्याच्या पद्धतीच्या होत्या. त्यांना क्लच असे. आज स्कूटर्सना क्लच नाहीत. फोरस्ट्रोक असणाऱ्या या नव्या स्कूटर्सनी पूर्वीच्या मोपेडसची सुधारित आवृत्ती धारण केलेली आहे. चालवायला सोप्या असल्याने व वजनाला हलक्या असल्याने साहजिकच महिलांनाही त्या सहज हाताळण्याजोग्या बनल्या आहेत. बॅटरी हा देखील आजच्या स्कूटर्सचा प्राण झाला आहे.याचमुळे आलेली सुलभता लक्षात घेऊन अनेकांची स्कूटर वापरण्याची व देखभाल करण्याची पद्धतही चुकीची होत चाललेली आहे.सकाळी स्कूटर सुरू करताना थेट बटनस्टार्ट करून मार्गक्रमण सुरू करणे, चोकचा वापर न करणे, काही दिवस न वापरता स्कूटर तशीच ठेवणे व अचानक बऱ्याच दिवसांनी ती वापरण्यासाठी जाताच पुन्हा बटणस्टार्टचा अवलंब करणे. स्कूटरचा पीकअप झटकन घेणे,अकस्मात जोरदार ब्रेकींग करणे, काही जण तर स्कूटरचा स्पीड दहाच्याही वर न नेता सायकलसारखीच गती ठेवून चालवतात... अशा अनेक प्रकारच्या चुकीच्या हाताळणीमुळे स्कूटर्सची प्रकृती स्वतःहून बिघडवण्याचे काम केले जात असते. स्कूटर्स पूर्वीसारख्या रफटफ, दणकट नाहीत, तसेच त्या इलेक्ट्रॉनिक्स पद्धतीच्या आहेत हे लक्षात घेऊन स्कूटरची हाताळणी करणे गरजेचे आहे. त्यामुळे स्कूटरचे आरोग्य चांगले राहाते व वेळेवर दगा देण्याचे प्रकारही होत नाहीत. स्कूटरचा वाढलेला वापर म्हणजे तिच्यासाठी वेळ द्यावा लागत नाही, सर्व्हिसच्यावेळी पाहू, अशी चालढकल करणे उपयोगाचे नाही. काही साध्या साध्या बाबी रोजच्या रोज केल्या, तशी सवय ठेवली तर तुमच्या स्कूटरचे आयुष्यही वाढेल व निरोगीही राहील. त्यामुळे स्कूटरचा वापर केवळ सुलभच नाही तर आनंददायी होईल,ड्रायव्हिंगही प्लेझंट वाटेल.

स्कूटर रोज वापरावी व दिवसाच्या सुरुवातीच्या वापरापूर्वी बटनस्टार्ट न करता, स्कूटरला चोक देऊन ती किक मारून सुरू करावी साधारण अर्धा मिनिट चोक सुरू ठेवून मग तो बंद करावा. त्यानंतर स्कूटरवर स्वार होऊन मार्गक्रमण करावे. दिवसभरात सिग्नल वगळता जेव्हा स्कूटर किकने सुरू करणे शक्य असेल तेव्हा किकने स्कूटर सुरू करावी. त्यामुळे किकचे कामकाजही वापात राहील व तुम्हाला आवश्यक तेव्हा किकचा वापर करता येईल,तसेच स्कूटरच्या इंजिनला होणारा इंधन पुरवठा यामुळे अधिक सुरळीतपणे होईल. मायलेज चांगले मिळू शकेल, बॅटरीचा वापरही नीट राहील व अति बटनस्टार्टमुळे बॅटरीवर पडणारा ताण व त्यामुळे बॅटरी डाऊन झाल्यास असणारी भीती राहाणार नाही. बऱ्याच दिवसानंतर स्कूटर सुरू करतानाही चोक देऊन किकने स्कूटर सुरू करावी. त्यामुळे बॅटरी डाऊन असली तरी फरक पडणार नाही व स्टार्ट केल्यानंतर बॅटरी चार्ज होण्यास सुरुवात होईल. बॅटरी डाऊन होऊ नये यासाठी शक्यतो स्कूटर नियमितपणे वापरावी. त्यामुळे बॅटरी सातत्याने कार्यान्वित राहून तिचे आयुष्य काहीसे वाढेल.

Web Title: Start the scooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.