Air Purifier Helmet: अफलातून हेल्मेट! वाहतूक कोंडी, सिग्नल कुठेही फिरा, मिळणार स्वच्छ हवा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2022 03:38 PM2022-08-24T15:38:38+5:302022-08-24T15:39:08+5:30
एका स्टार्टअपने अफलातून शोध लावला आहे. या स्टार्टअपने स्वच्छ हवा देणारे हेल्मेट विकसित केले आहे. बाईक, स्कूटर चालविताना तुम्हाला दुहेरी संरक्षण मिळणार आहे.
दिल्ली काय की गल्ली काय, रस्त्यावर आता एवढी वाहने आहेत की त्यांचा धुर आणि धुळीमुळे अनेकांना श्वसनाचे विकार होऊ लागले आहेत. त्यात बाईकवरून जात असताना तर बस, ट्रक, टेम्पो यांचा काळाकुट्ट धुर नाका-तोंडात गेलाच म्हणून समजा. मग तुम्ही हेल्मेट घाला की स्कार्फ गुंडाळा, घुसमट ही होतेच. पण आता यापासून सुटका होणार आहे.
एका स्टार्टअपने अफलातून शोध लावला आहे. या स्टार्टअपने स्वच्छ हवा देणारे हेल्मेट विकसित केले आहे. बाईक, स्कूटर चालविताना तुम्हाला दुहेरी संरक्षण मिळणार आहे. Shellios Technolabs ने हे हेल्मेट विकसित केले आहे. या हेल्मेटचे नाव PUROS आहे. या हेल्मेटमध्ये एअर प्युरिफायर सिस्टिम लावण्यात आली आहे. यामुळे हे हेल्मेट घातल्यानंतर तुम्हाला वाहतूक कोंडीतही शुद्ध हवा घेता येणार आहे.
या हेल्मेटमध्ये ब्रशलेस डीसी ब्लोअर फॅन लावण्यात आला आहे. याचबरोबर कार किंवा अन्य कोणत्याही एअर प्युरिफायरमध्ये असतो तो हेपा एअर फिल्टर मेंब्रेन देण्यात आला आहे. हे सारे काम करण्यासाठी एक इलेक्ट्रीक सर्किटही देण्यात आले आहे. हेल्मेटमधील प्युरिफायर बाहेरील येणारी हवा स्वच्छ करून आतमध्ये पाठवतो. यामुळे हेल्मेट घालणाऱ्यांना स्वच्छ हवा मिळते.
हायटेक...
हेल्मेटमध्ये तुम्हाला मायक्रो USB चार्जिंग पोर्ट देण्यात आला आहे. तसेच हे हेल्मेट तुम्ही तुमच्या स्मार्टफोनशी ब्लूटूथने कनेक्ट करू शकता. यासाठीचे अॅप तुम्हाला एअर फिल्टर कधी क्लिन करावा, याची सूचना देणार आहे. या हेल्मेटची किंमत 4,500 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर चार रंगात हे हेल्मेट उपलब्ध आहे.
या हेल्मेटचे वजन १.५ किलो आहे. सध्या बाजारात ८०० ग्रॅमपासून वजनाची हेल्मेट मिळतात. या स्टार्टअपला स्टार्टअपला विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय आणि तंत्रज्ञान उद्योजक पार्क (JSSATE-STEP) कडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. या हेल्मेटला युटिलिटी पेटंटही मिळाले आहे.