सिग्नलला थांबताना योग्य अंतर राखून वाहन थांबवणे हे सर्वांच्याच सुरक्षिततेसाठी आवश्यक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2017 09:29 AM2017-11-28T09:29:11+5:302017-11-28T09:30:04+5:30
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगपूर्वी असलेल्या पांढ-या आडव्या रेषेआधी वाहन थांबवणे व हिरवा सिग्नल लागल्यानंतर मगच पुढे जाणे गरजेचे आहे. हा नियम आहेच पण त्यापेक्षाही सूज्ञ नागरीकाचेही लक्षण आहे.
वाहतूक सिग्नलला योग्यवेळी थांबणे हे सर्वात महत्त्वाचे असते. मुंबई, पुण्यासारख्या शहरांमध्ये सिग्नल यंत्रणा खूप ब-यापैकी प्रभावी आहेत. त्यांचा उपयोग खरे म्हणजे प्रत्येका वाहनचालकाने नीट केला आणि वाहतूक, पार्किंगचे विविध नियम किमान 70 टक्के जरी पाळले तरी प्रचंड वाढलेल्या वाहनांच्या संख्येमध्येही वाहतूक कोंडीची समस्या नाही म्हटली तरी ब-याच प्रमाणात कमी होऊ शकेल. सिग्नल यंत्रणा, त्याद्वारे दिले जाणारे संकेत हे म्हणूनच अतिशय मोलाचे असतात. तसेच सिग्नलचा अर्थ नेमका समजून त्यानुसार सिग्नलपूर्वी असलेल्या दोन आडव्या पांढ-या रेषांपूर्वी तुम्ही तुमचे वाहन थांबवणे गरजेचे आहे. या रेषा झेब्रा क्रॉसिंगच्या आधी असतात. त्याआधी वाहन थांबवणे गरजेचे आहेच, कारण त्यामुळे पादचारीही योग्य पद्धतीने रस्ता ओलांडू शकतील. सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत म्हणून मुंबईत आज या रेषांचे पालन गेल्या काही महिन्यांपासून अनेकजण करू लागले आहेत. सीसीटीव्हीमुळे अयोग्य पद्धतीने सिग्नलला उभ्या असणा-या वाहनांवर कारवाई होते, पोलीस नियंत्रण त्यावर आहे, त्यामुळे हे होत आहे. हा कदाचित काहींना समज तर काहींना गैरसमजही वाटू शकला तरी वस्तुस्थिती मात्र काही सुधार झाल्यासारखी आहे हे कमी नाही.
सिग्नलला वाहन थांबवताना तुम्हा पुढे सरळ जायचे आहे की डाव्या वा उजव्या बाजूला वळायचे आहे की यू टर्न घ्यायचा आहे, हे देखील चालकाने लक्षात घेतले पाहिजेच. त्यानुसार वाहन योग्य रांगेत ठेवमे, यू टर्न नसेल तर तेथे यू टर्न घेऊ नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सिग्नल कधी हिरवा होणार आहे त्याचा अंदाज असला किंवा डिजिटल सेकंद दिसतात, त्या दर्शकानुसार आधीच पुढे वाहन सरकवण्याचा प्रकारही टाळला गेला पाहिजे. मुळात सिग्नलचा वापर अतिशय शिस्तबद्धपणे करायला हवा. तो पाळायला हवा. त्यावर नियंत्रण ठेवणारी पोलीस यंत्रणा तशी प्रभावी नाही. त्यांची संख्या कमी असेल किंवा ती त्यामुळे निष्प्रभ वाटत असेल तरी मुळात सिग्नलचा मान राखायला हवा. तो अनेकदा राखला जात नाही, हे जरी थांबले तरी वाहन चालकाला ड्रायव्हिंग सेन्स, मानसिक स्थिरताही नीटपणे येऊ शकेल. उतावळेपणाला आळा घालणारा हा सिग्नल खरे म्हणजे प्रत्येकाला मानसिक स्थिर राहायला सागणारा आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.
सिग्नलबाबत मोठ्या रस्त्यावर, महामार्गावर, लेव्हल क्रॉसिंगवर विशेष जाणीवपूर्वक लक्ष देऊन अनुसरणे गरजेचे आहे. अनेकदा मोठ्या रस्त्यांवर वाहनाचा वेग कमी करायचाच नाही, सिग्नल उडवायचा या विचारातून सिग्नल उडवला जातो, अशावेळी आडव्या जाणाऱ्या व सिग्नल पाळून तेथे थांबलेल्या अन्य वाहनालाही धडक बसू शकते. वाहन चालवताना केवळ स्वतःच्या वाहनाचा वा स्वतःचा विचार करून योग्य नाही. अन्य वाहनचालक हे तुमच्या बेदरकार व नियम उल्लंघन करण्याच्या प्रकारामुळे धास्तावू शकतात, दुचाकीसारखी छोटी वाहने थांबलेली असली, तर त्यांच्या बाजूने जागा आहे म्हणून सिग्नल लाल असतानाही तो उडवून जाणे यामुळे दुचाकीस्वाराला धक्काही बसू शकतो, त्याचा तोलही जाऊ शकतो, हे मोठ्या वाहनांच्या चालकांनी गांभीर्याने लक्षात घेण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे दुचाकी चालकांनीही सिग्नल उडवून वाहनांमधील गॅपमधून जाण्याचा व सिग्नल न जुमानण्याचा प्रकार होत असतो. अशावेळी अन्य वाहनांनाही दुचाकीची धडक बसू शकते व दुचाकीस्वारालाही त्यामुळे इजा होऊ शकते, त्याचप्रमाणे सिग्नलला थांबलेल्या अन्य दुचाकींनाही तुमचा धक्का लागू शकतो. एखादा पादचारी रस्ता ओलांडण्यासाठी आलेला असताना त्यालाही तुमच्या बेदरकारीचा फटका बसू शकतो. यामुळेच सिग्नलला योग्य अंतरापूर्वी वाहन थांबवण्याची दक्षता घेणे, योग्य रांगेत राहाणे ही गरजेची, सुरक्षिततेची व चांगल्या नागरीकाची खूण आहे, हे लक्षात घेतले पाहिजे.