इलेक्ट्रिक वाहनांसाठी कंपन्यांची जोरदार तयारी, गुंतवणुकीत वाढ; हायब्रीड मॉडेल्सची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2022 04:25 PM2022-09-06T16:25:58+5:302022-09-06T16:27:04+5:30
टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे.
नवी दिल्ली : पर्यावरणपूरक इंधनाला चालना देण्यासाठी वाहन उत्पादक कंपन्या वेगवेगळ्या धोरणांचा अवलंब करत आहेत. टाटा मोटर्स आणि महिंद्रासारख्या कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांवर (ईव्ही) अधिक जोर देत असून टोयोटा, होंडा आणि सुझुकीसारख्या मोठ्या जपानी कंपन्या हायब्रीड मॉडेल्ससाठी जोर देत आहेत.
टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा पुढील काही वर्षांत अनेक बॅटरीवरील इलेक्ट्रिक वाहने बाजारात उतरवण्याची योजना आखत आहेत. या कंपन्यांनी या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली आहे. देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीदेखील २०२५ मध्ये आपले पहिले इलेक्ट्रिक वाहन सादर करण्याच्या तयारीत आहे.
दरम्यान, मारुती सुझुकीने आपल्या कार अधिक इंधन कार्यक्षम बनविण्यासाठी हायब्रीड तंत्रज्ञानावर जोर दिला आहे. याशिवाय टोयोटा आणि होंडानेही हायब्रीड मॉडेल्स देशात आणले आहेत.
पेट्रोल, डिझेल वाहनांसाठी पर्याय...
- जगभरात इलेक्ट्रिक वाहन तंत्रज्ञान झपाट्याने स्वीकारले जात आहे.
- यामध्ये मजबूत हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन, फ्यूल सेल इलेक्ट्रिक वाहन, बॅटरी इलेक्ट्रिक वाहन आणि प्लग-इन हायब्रिड इलेक्ट्रिक वाहने अधिक प्रमाणात वापरली जात आहेत.
- सध्या भारतात फक्त बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक वाहने आणि हायब्रिड वाहने तयार केली जात आहेत.