असाही कारवेडा...! '1' नंबरसाठी मोजले तब्बल 31 लाख
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 04:56 PM2019-02-05T16:56:47+5:302019-02-05T16:58:11+5:30
केरळची राजधानी तिरुवअनंतपुरममध्ये सोमवारी आरटीओ विभागाने KL 01 CK 1 या एकमेव नंबरसाठी लिलाव आयोजित केला होता.
नवी दिल्ली : आपल्या पसंतीची कार खरेदी करण्याचे स्वप्न प्रत्येकाचेच असते. या कारला मिळणारा नंबरही आकर्षक असावा असेही अनेकांना वाटते. या हौसेपायी कारच्या किंमतीएवढाच पैसा नंबरसाठी मोजल्याचीही अनेक उदाहरणे आहेत. केरळमध्ये एका व्य़क्तीने त्याच्या नव्य़ा कोऱ्या Porsche 718 Boxster कारच्या नंबरसाठी तब्बल 31 लाख रुपये खर्च केले आहेत.
केरळची राजधानी तिरुवअनंतपुरममध्ये सोमवारी आरटीओ विभागाने KL 01 CK 1 या एकमेव नंबरसाठी लिलाव आयोजित केला होता. या नंबरसाठी तिरुवअनंतपुरममधील औषधांचे व्यापारी के. एस. बालगोपाळ आणि दुबईचे दोन एनआरआय यांनी बोली लावली होती.
महत्वाचे म्हणजे य़ा नंबरसाठी 500 रुपयांपासून बोली सुरु झाली होती. ही बोली 10 लाखांवर गेल्यावर दुबईतील आनंद गणेश यांनी माघार घेतली. तर हीच बोली 25.5 लाखांवर गेली तरीही दुबईचे दुसरे भारतीय शाईन युसुफ स्पर्धेमध्ये टिकून होते. मात्र, बालगोपाळ यांनी 30 लाखांचा आकडा सांगितला आणि युसुफ यांनीही माघार घेतली. अशा प्रकारे बालगोपाळ यांनी हा नंबर जिंकला. त्यांनी आरटीओला एकूण 31 लाख रुपये दिले. यामध्ये 30 लाख रुपये बोलीचे आणि 1 लाख रुपये अर्जाचे शुल्क होते.
Porsche 718 Boxster च्या या कारची किंमत 1.2 कोटी रुपये आहे. बालगोपाळ यांनी Toyota Land Cruiser साठीही आकर्षक नंबर घेतला होता. यावेळी त्यांनी 19 लाख रुपये मोजले होते.