तप्त सूर्यकिरणांपासून कारचा बचाव करणारे सनशेड
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 01:15 PM2017-09-07T13:15:00+5:302017-09-07T13:21:18+5:30
कडकडीत उन पडले की कार चांगलीच तापते. आतील डॅशबोर्ड, स्टिअरिंग, अशा प्लॅस्टिक आवरणाला तर हात लावला की चटकेच बसतात. कार उन्हात पार्क असली, विंडशील्डच्या ठिकाणाहून सूर्याचे प्रखर किरण आत येत असले की कारच्या पुढच्या भागात तर चटके बसतात
कडकडीत उन पडले की कार चांगलीच तापते. आतील डॅशबोर्ड, स्टिअरिंग, अशा प्लॅस्टिक आवरणाला तर हात लावला की चटकेच बसतात. कार उन्हात पार्क असली, विंडशील्डच्या ठिकाणाहून सूर्याचे प्रखर किरण आत येत असले की कारच्या पुढच्या भागात तर चटके बसतात. मग कार सुरू करण्यापूर्वी दारे उघडी ठेवून काही वेळ कूलींग करण्याचा प्रयत्न होतो. ओल्या फडक्याने पुसून घेऊन ही उष्णता कमी करण्याचा प्रयत्न करतो. सर्वांकडेच काही शेडमधील पार्किंग उपलब्ध असते असे नाही. त्यामुळे ही सारी उन्हाची तलखी सहन करावी लागते. यामुळे ए.सी. लावला तरी सुरुवातीला कूलींगचा थंडपणाही मिळत नाही. एकूण सूर्यप्रकाशाचा कडकपणा त्रासदायक होतो. सावलीत उभी करण्यासाठी कारला जागाही नसते.
अशा परिस्थितीत पुढील व मागील बाजूने सूर्यप्रकाश रोखणे, त्याचे किरण परावर्तीत करणारे चांदीसारखे चकचकीत कव्हर असणारे सनशेड वायझर उपयोगाला येते. कारच्या बाहेरच्या बाजूने हे लावायचे असते. त्यामुळे सूर्यप्रकाश त्यावर पडताच तो परावर्तीतही होतो व सनशेड काचेवर ठेवल्याने आतील भाग सावलीतही जातो. बाहेरच्या बाजूला ते ठेवल्याने काचही गरम होत नाही. मात्र बाहेर ठेवण्यासारखी परिस्थिती सर्व ठिकाणी असेल असेही नाही. ते चोरीला जाण्याची, खराब होण्याचीही शक्यता असते. यासाठी काही जण त्याचा वापर करण्यासाठी कारच्या डॅशबोर्डवर आतील बाजूने सनशेड वायझर लावतात. त्यामुळेहू परिणाम चांगला होतो, पण काचेवर सूर्यकिरणांची प्रखरता येत असल्याने काच तापतेच. अर्थात हे सारे करण्यामागचा हेतू काही अंशाने नव्हे तर बऱ्यापैकी सफल होतो.
सनशेड हे साधन अतिरिक्त असून ते काही कार विकत घेताना दिले जात नाही. तुम्हाला ते बाजारातून घ्यावे लागते. आजकाल ऑनलाइन विक्रीद्वारेही बरीच साधनसामग्री मिळत असते. पण प्रत्यक्ष एखादी वस्तू पाहाणे, ती अनुभवणे, तिची किंमत तपासणे, चार दुकानांमध्ये जाऊन त्याचे प्रकारही प्रत्यक्ष पाहाणे हे काही ऑनलाइनवर शक्य होत नाही. सनशेडचे वेगळे आकार, कंपन्या या बाजारात प्रत्यक्ष पाहू शकता. त्याचा वापर करणे भारतातील अनेक उष्ण भागात उपयुक्त ठरतो. पार्किंग सावलीत करण्याची सुविधा सर्वांकडे नसली तरी कारमधील वातावरण गरम न होऊ देण्यासाठी हे एक तसे सुटसुटीत साधन आहे. उन्हात पत्रा तापतो पण त्याला सनशेडचा हा उपाय कामाचा नाही. कारण याचा आकारही तुमच्या कारच्या काचेइतका असतो. पण त्यामुळे कारमध्ये सूर्यप्रकाश थेट येऊन कारचा आतील भाग गरम होण्यापासून बऱ्याच अंशी वाचतो, हे मात्र खरे.