इलेक्ट्रिक वाहनांवर 'येथे' येणार बंदी; हिवाळ्यामुळे का घ्यावा लागला निर्णय?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2022 08:15 AM2022-12-08T08:15:32+5:302022-12-08T08:15:55+5:30
स्वित्झर्लंड विजेच्या बाबतीत फ्रान्स व जर्मनी यांसारख्या अन्य देशांवर अवलंबून आहे. बर्फवृष्टीमुळे या वीजपुरवठादार देशांतही विजेची मागणी वाढते.
प्रदूषणापासून मुक्ती मिळविण्याच्या प्रयत्नात इलेक्ट्रिक वाहनांना जगभर प्रोत्साहन दिले जात आहे. भारतातही या वाहनांची खरेदी जवळपास ८०० टक्क्यांनी वाढली आहे. मात्र, एक देश असा आहे जिथे इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याची तयारी चालविली आहे. हा देश आहे स्वित्झर्लंड. हा निर्णय झाल्यास स्वित्झर्लंडची इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालणारा एकमेव देश ठरेल.
कशामुळे बंदीचा निर्णय?
स्वित्झर्लंडमध्ये हिवाळ्यात तापमान शून्याच्या खूपच खाली जाते. घरे गरम ठेवण्यासाठी विजेवर चालणारे हिटर तेथे वापरले जातात. संपूर्ण देशात बर्फवृष्टी होत असल्यामुळे वीजपुरवठ्यावर परिणाम होतो. वीजटंचाईची संभाव्य शक्यता लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांवर बंदी घालण्याचा विचार तेथील सरकार करीत आहे.
बंदीमुळे काय होणार?
वीजटंचाई लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगवर बंदी घातली जाऊ शकते. इलेक्ट्रिक वाहनांवरील बंदीमुळे जी वीज वाचेल तिचा वापर घरांतील वीजपुरवठ्यासाठी केला जाईल. त्यामुळे लोकांना हिवाळ्यातील कडाक्याच्या थंडीपासून दिलासा मिळेल, असे स्वित्झर्लंडची वीज नियामकीय संस्था एलकॉमने म्हटले आहे.
विजेसाठी अन्य देशांवर अवलंबून
स्वित्झर्लंड विजेच्या बाबतीत फ्रान्स व जर्मनी यांसारख्या अन्य देशांवर अवलंबून आहे. बर्फवृष्टीमुळे या वीजपुरवठादार देशांतही विजेची मागणी वाढते. युरोपातील काही देश आताच वीजटंचाईच्या संकटाचा सामना करीत आहेत. त्यामुळे हिवाळ्यात स्वित्झर्लंडला पुरेशी वीज मिळण्याची शक्यता कमी आहे.
रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम
रशिया-आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे युरोपीय देशात गॅसची टंचाई निर्माण झाली आहे. रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश युरोपला मोठ्या प्रमाणात गॅस पुरवठा करतात. युरोपमध्ये हिवाळ्यात वीजनिर्मितीसाठी गॅसचा वापर होतो.
स्वीस फेडरल इलेक्ट्रिसिटी कमिशनने जूनमध्येच एक निवेदन जारी करून हिवाळ्यात वीजटंचाईचे संकट येऊ शकते, असा इशारा दिला होता. फ्रान्समधील अणुऊर्जा प्रकल्पातून वीजपुरवठा थांबल्यामुळे देशावर वीजटंचाईचे संकट घोंघावत आहे, असे कमिशनने म्हटले होते.