ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 11:37 AM2024-11-01T11:37:56+5:302024-11-01T11:39:43+5:30
केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) काही कंपन्यांची चाैकशी करणार आहे.
नवी दिल्ली : गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री माेठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातही इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. मात्र, इलेक्ट्रिक स्कूटरसंदर्भात तक्रारींचा पाऊस पडत असून, केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण (सीसीपीए) काही कंपन्यांची चाैकशी करणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्वाधिक तक्रारी विक्रीपश्चात सेवेतील त्रुटींबाबत आहेत. सीसीपीए ओला इलेक्ट्रिक, बजाज, टीव्हीएस माेटर, अथर एनर्जीसह इतर कंपन्यांची चाैकशी करणार आहे. वाॅरंटी व इतर आावश्यक बाबींची पूर्तता करते का, याचा तपास करण्यात येत आहे.
रिफंडचे धाेरण बदलण्याबाबत सरकार आग्रही
केंद्र सरकारच्या चाैकशीमुळे कंपन्यांच्या अडचणी वाढणार आहेत. ग्राहकांना कंपन्या ज्या पद्धतीने रिफंड देतात, त्यात बदल करा, असे सरकारचे म्हणणे आहे. ग्राहकांशी संबंधित मंत्रालयाच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी रिफंड धाेरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले हाेते.
ग्राहकांना जसा हवा, तसा परतावा कंपन्यांना द्यावा लागेल. कंपन्या रिफंड म्हणून कुपन देत हाेत्या. ते दुसऱ्या बुकिंगसाठी वापरता येत हाेते. म्हणजेच, ग्राहकांसमाेर दुसरा पर्यायच ठेवला जात नव्हता. यावर आयुक्तांनी बाेट ठेवले हाेते.
१२,००० तक्रारी या कंपन्यांविराेधात प्राप्त झाल्या आहेत.
१०,६०० तक्रारी केवळ ओला इलेक्ट्रिकविराेधात प्राप्त झाल्या हाेत्या.