पावसाळ्यात कार सांभाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 08:32 PM2017-08-08T20:32:20+5:302017-08-08T20:32:35+5:30
पावसाळ्याचा आनंद लुटताना जशी आपल्या आरोग्याचीही काळजी घेत असतो, तशीच काळजी पावसाळ्यामध्ये आपल्या कारची घेणे गरजेचे आहे.
पावसाळा आल्हाददायक असतो, पण वाहनासाठी पाऊस हा संवेदनशील घटक आहे. गाडी पार्क असो वा ती तुम्ही नियमितपणे चालवत असा पावसाळ्यामध्ये तुमच्या गाडीला सांभाळणे सोपे नाही. तरीही कारला जपावे लागते, सांभाळावे लागतेच. नाहीतर काही ना काही कटकटी मागे लागण्याची शक्यता अधिक असते. कार असो वा स्कूटर त्यांची काळजी एक वस्तू म्हणून घेणे गरजेचे आहे. तसेच रस्त्यावर ते वाहन चालवतानाही अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे वाहनाची काळजी घेणे वाहन चालवण्याशीही निगडित आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच काही बाबींची निगा राखण्यास सुरुवात करायला हवी. शहरी भाग व ग्रामीण भाग यामध्ये पर्जन्यमानात काही फरक असला तरी वाहनाची निगा राखण्यात बऱ्याच बाबी सारख्या आहेत.
पावसाळ्यापूर्वी चारचाकी वाहनाच्या तळातील बाजूला गंज प्रतिबंधक रंग (antirust coating) लावून घ्यावा. तो आधी लावला असेल तर किमान तो ठीकठाक आहे की नाही ते तपासावे. मागील व पुढील काचांच्या कडांनी पाणी आत येत नसल्याचीही तपासणी करावी व तसे काही वाटले तर त्या कडांमधून होणारी गळती बंद करून घ्यावी. तसेच सर्व बाचूच्या काचा वरखाली होत आहेत की नाहीत, त्यात काही अडथळा नाही ना, ते पाहावे. वायपर नीट काम करीत आहेत का ते पाहावे. वायपर ब्लेडस् खराब झाली असतील तर ती बदलावीत. हेडलॅम्प, टेल लॅम्प, ब्रेक लाइट पूणर्पणे तपासून घ्यावेत, बल्ब गेला असेल तर बदली करावेत. पावसाळ्यात अनेकदा काचा बंद असल्याने वाहनाच्या अंतर्भागात दमटपणा तयार होत असतो. त्यासाठी आत रबर मॅटखाली नॅप्थॅलिनच्या गोळ्या टाकून ठेवा, किंवा त्या धर्तीच्या सुगंधित गोळ्याही मिळतात त्या टाकाव्यात. त्यामुळे वाहनातील दमटपणा शोषून घेण्यास मदत होते.
सर्व टायर्स तपासून गरज पडल्यास टायर बदलून घ्यावेत. टायरबाबत पावसाळ्यात अतिशय दक्षता घेणे गरजेचे आहे. कारच्या काचा पार्किंग लॉट झाकलेला असेल तर काचा थोड्या खाली ठेवण्यासही हरकत नाही मात्र मोकळ्या जागेतील पार्किंगच्यावेळी काचा उघड्या ठेवू नयेत. पावसामध्ये कार चालवताना दक्षता घ्यायची असतेच पण त्याचबरोबर पावसाळ्यामध्ये कारचीही काळजी घ्यावी लागते. पावसापूर्वी सर्व्हिसिंग होणेही गरजेचे आहे कारण त्यावेळी कारचे बॅटरी, ब्रेक्स, टायर्स, अंतर्गत सफाई, या साऱ्यांची तपासणी होणे महत्त्वाचे असते. कारण तुमची सुरक्षितता त्यावर तर अवलंबून असते.