परदेशी कार कंपन्यांना टाटा-महिंद्राकडून धोबीपछाड, विक्रीत जोरदार वाढ, समोर आली आकडेवारी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:00 PM2022-09-20T12:00:21+5:302022-09-20T12:01:28+5:30
Indian Car Market Updates: भारतीय कार बाजारातील चित्र गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलत चालले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत.
मुंबई - भारतीय कार बाजारातील चित्र गेल्या काही दिवसांपासून झपाट्याने बदलत चालले आहे. एकीकडे सरकार इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देत आहे. तर दुसरीकडे ग्राहकांच्या आवडीनिवडीही बदलत आहेत. छोट्या कारसाठी प्रसिद्ध असलेले भारतीय ग्राहक आता एसयूव्ही खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्याचा परिणाम भारतीय कार बाजारावर स्पष्टपणे दिसून येत आहे. त्याचा फायदा टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रा यासारख्या भारतीय कार कंपन्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होत आहे. तर परदेशी कंपन्यांची भारतीय बाजारांमधील भागीदारी सातत्याने घटत आहे.
भारतीय कार मार्केटमधील भागीदारीचा विचार केल्यास मारुती-सुझुकी अद्यापही पहिल्या क्रमांकावर आहे. मात्र गेल्या काही दिवसांत कंपनीची बाजारातील भागीदारी ही वेगाने कमी होत चालली आहे. कधीकाळी ही कंपनी कार बाजारामध्ये मक्तेदारी ठेवून होती. तसेच देशातील एकूण कारविक्रीपैकी अर्ध्याहून अधिक कारची विक्री करायची. मात्र आता कार बाजारातील मारुती सुझुकीची हिस्सेदारी ही कमी होऊन ४० टक्क्यांच्या खाली आली आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये मारुती सुझुकीच्या भारतीय कार बाजारामधील भागीदारीमध्ये आठ टक्क्यांनी घट दिसून आली आहे.
भारतातील कार बाजारात होत असलेल्या या बदलांचा सर्वाधिक फायदा हा टाटा मोटर्सला झाला आहे. टाटा मोटर्सने एसयूव्हीची वाढती मागणी विचारात घेऊन नेक्सन, हॅरियर आणि पंचसारखे मॉडेल लॉन्च केले आहेत. नेक्सन भारतीय ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. तिचं इलेक्ट्रिक रूप नेक्सन ईव्ही भारतीय बाजारात सर्वाधिक विकली जाणारी इलेक्ट्रिक कार आहे.
ऑगस्ट महिन्यातील विक्रीचे आकडे पाहिल्यास १ लाख ३४ हजार १६६ युनिट्सच्या विक्रीसह मारुती सुझुकी पहिल्या स्थानावर आहे. त्यानंतर हुंडाईचा नंबर लागला. हुंडाईने ऑगस्ट महिन्यात ४९ हजार ५१० कारची विक्री केली. तर टाटा आणि महिंद्राच्या वाढीचा आकडा जबरदस्त आहे. ऑगस्ट महिन्यात टाटा मोटर्सच्या ४७ हजार १६६ कार विकल्या गेल्या. गतवर्षीच्या तुलनेत ही वाढ ६८ टक्के आहे. तर महिंद्राच्या पॅसेंजर वाहनांच्या विक्रीत ८७ टक्क्यांनी वाढ दिसून आली. महिंद्राच्या २९ हजार ८५२ युनिट्सवर पोहोचली आहे.