EV क्षेत्रात स्वदेशी कंपन्यांची मुसंडी! टाटा-महिंद्राच्या विक्रीत मोठी वाढ; ह्युंदाईला धोबीपछाड
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 12:06 AM2022-02-03T00:06:34+5:302022-02-03T00:09:55+5:30
ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमी कंडक्टर चीपचा मोठा तुटवडा असताना भारतीय कंपन्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल.
नवी दिल्ली: गेल्या अनेक महिन्यांपासून भारतीय बाजारपेठेत मेड इन इंडिया वाहनांचा अधिक बोलबाला असल्याचे दिसून येत आहे. इंधन असो किंवा इलेक्ट्रिक वाहन विक्री असो, स्वदेशी कंपन्यांनी जोरदार मुसंडी मारत अनेक बड्या कंपन्यांना धोबीपछाड दिल्याचे पाहायला मिळत आहे. यामध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा आघाडीवर असून, जानेवारी महिन्यात या दोन्ही कंपन्यांना विक्रीच्या बाबतीत बडे अच्छे दिन आल्याचे दिसत आहे.
आताच्या घडीला ऑटोमोबाइल क्षेत्रात सेमी कंडक्टर चीपचा मोठा तुटवडा असला, तरी भारतीय कंपन्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय अशीच म्हणावी लागेल. टाटा मोटर्सची एकूण विक्री जानेवारी २०२२ मध्ये २७ टक्के वाढून ती ७६ हजार २१० वर पोहोचली आहे. यात आंतरराष्ट्रीय विक्रीचाही समावेश आहे. टाटा मोटर्सने मंगळवारी सांगितले की, कंपनीने जानेवारी २०२१ मध्ये ५९ हजार ८६६ वाहनांची विक्री केली.
इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत पाच पट वाढ
टाटा मोटर्सच्या माहितीनुसार, जानेवारी महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या विक्रीत पाच पट वाढ झाली असून २,८९२ वर पोहोचली आहे. कंपनीने जानेवारी २०२१ मध्ये ५१४ इलेक्ट्रिक वाहनांची विक्री केली होती. जानेवारी २०२२ मध्ये बाजारात वार्षिक विक्रीच्या आधारावर २६ टक्के वाढून ७२ हजार ४८५ वर पोहोचली आहे. एक महिन्यापूर्वी हे ५७ हजार ६४९ वर पोहोचली होती. कंपनीने महिन्यादरम्यान एकूण ४० हजार ७७७ प्रवासी वाहनांची विक्री केली होती. तर जानेवारी २०२१ मध्ये २६ हजार ९७८ वाहनांची विक्री केली होती.
महिंद्राच्या वाहन विक्रीत २० टक्क्यांची वाढ
महिंद्रा कंपनीनेही वाहन विक्रीत २० टक्क्यांची मोठी वाढ नोंदवली आहे. कंपनीची एकूण विक्री जानेवारी २०२२ मध्ये ४६ हजार ८०४ वर पोहोचली आहे. गतवर्षी या महिन्यात महिंद्राने ३९ हजार १४९ गाड्यांची विक्री केली होती. कंपनीने गतवर्षी डोमेस्टिक बाजारात १९ हजार ९६४ वाहनांची विक्री केली होती. यंदा याच कालावधीत २० हजार ६३४ वाहनांची विक्री केली. महिंद्राच्या कमर्शियल वाहनांची विक्री जानेवारी २०२२ मध्ये २३ हजार ९७९ वर पोहोचली आहे. एक वर्षाआधी याच महिन्यात कंपनीने याच गटात १६ हजार २२९ वाहनांची विक्री केली होती. कंपनीचे त्या महिन्यातील एक्सपोर्ट २,८६१ वाहनांची केली आहे. जी मागील वर्षी २,२८६ होती.
दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडियाची एकूण विक्री जानेवारी २०२२ मद्ये ११.११ टक्के घसरण होऊन ५३,४२७ झाली आहे. जानेवारी २०२१ मध्ये कंपनीने ६० हजार १०५ वाहनांची विक्री केली होती. कंपनीच्या माहितीनुसार, डोमेस्टिक विक्रीत १५.३५ टक्के घसरण होऊन ४४,०२२ झाली आहे.