Tata Motors नं दिला झटका! १ मे पासून कारच्या किमती महाग, जाणून घ्या यामागचं कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 12:43 PM2023-04-15T12:43:49+5:302023-04-15T12:45:12+5:30
देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे.
नवी दिल्ली-
देशातील प्रमुख वाहन निर्माती कंपनी टाटा मोटर्सनं आपल्या पेसेंजर व्हेइकल लाइन-अपमधील वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. नुकतंच कंपनीनं आपल्या व्यावसायिक श्रेणीतील वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. आता टाटा पंच, सफारी इत्यादींसारख्या कारच्या किमतीत वाढ केली आहे. कंपनीनं जारी केलेल्या पत्रकानुसार नवे दर १ मे २०२३ पासून लागू होणार आहेत.
टाटा मोटर्सची कोणतीही कार खरेदी करण्याचा तुम्ही जर विचार करत असेल तर १ मेच्या आधीच वाहनांच्या किमती तपासून घ्या आणि लवकरात लवकर खरेदी करुन टाका. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार वाहनांच्या एक्स-शो रुम किमतीत जवळपास ०.६ टक्क्यांनी वाढ केली जाणार आहे. कोणती कार किती महाग होईल याची सविस्तर माहिती अद्याप कंपनीनं जाहीर केलेली नाही. वेगवेगळ्या मॉडलवर वेगवेगळ्या पद्धतीनं वाढीव किमती ठरवल्या जाणार आहेत.
किंमत वाढण्याचं कारण काय?
टाटा मोटर्सच्या म्हणण्यानुसार नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स अंतर्गत वाहनांना अपडेट केल्यामुळे खर्चात वाढ झाली आहे. याच कारणामुळे वाहनांच्या किमती वाढवल्या जात आहेत. १ एप्रिल २०२३ मध्ये देशात नव्या रियल ड्रायव्हिंग इमिशन नॉर्म्स म्हणजेच BS6 फेज-२ लागू करण्यात आलं आहे. या नियमाअंतर्गत वाहन निर्मात्या कंपन्यांना वास्तवातील परिस्थितींमध्ये उत्सर्जन मानकांची पूर्तता करण्याची आवश्यकता असते. यासाठी कंपन्यांना आपल्या वाहनांना अपडेट करावं लागणार आहे.
वर्षभरात दोनेवळा किमतीत वाढ
टाटा मोटर्स कंपनीनं या वर्षभरात दोनवेळा वाहनांच्या किमतीत वाढ केली आहे. याआधी कंपनीनं फेब्रुवारी महिन्यात आपल्या पेसेंजर वाहनांच्या किमतीत वाढ केली होती. त्यावेळी देखील कंपनीनं इनपुट कॉस्ट वाढल्याचं कारण देत जवळपास १.२ टक्क्यांनी वाढ केली होती.