Tata Buys Ford Sanand Manufacturing PLant: अपमानाचा आणखी एक बदला! रतन टाटांच्या कंपनीने फोर्डचा प्लांटच विकत घेतला; ईव्ही बनविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2022 01:30 PM2022-08-08T13:30:12+5:302022-08-08T13:30:31+5:30
फोर्ड इंडियाकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 23000 कर्मचारी आहेत. टाटा मोटर्स या प्लांटमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे.
एकेकाळी टाटा मोटर्सचा पॅसेंजर कारचा बिझनेस विकत घ्या म्हणून रतन टाटाफोर्ड कंपनीच्या मालकाकडे गेले होते. परंतू त्यांना तेथून अपमानीत होऊन भारतात परतावे लागले होते. याच टाटांनी काही वर्षांपूर्वी फोर्डला डोईजड झालेली लँड रोव्हर कंपनीच विकत घेतली होती. आता पुन्हा एकदा टाटाने फोर्डवर उपकार केले आहेत.
फोर्ड गेल्या वर्षीच भारतीय बाजारातून बाहेर पडली आहे. यामुळे फोर्डचे भारतातील दोन प्रकल्प असेच पडून आहेत. यापैकी एक विकण्याच्या प्रयत्नात फोर्ड होती. टाटासोबत याची चर्चाही सुरु होती. अखेर ती डील झाली आहे. टाटाने फोर्डचा सानंदमधील मॅन्युफॅक्टरिंग प्लांट विकत घेतला आहे.
या प्लांटची 726 कोटी रुपयांना टाटाने खरेदी केली आहे. सानंदमध्ये टाटाचा आणखी एक प्लांट आहे. जिथे टाटा नॅनोचे उत्पादन होत होते. हा प्लांट फोर्डच्या प्लाँटच्या बरोबर समोरच होता.
फोर्ड इंडियाकडे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट असे 23000 कर्मचारी आहेत. टाटा मोटर्स या प्लांटमध्ये या सर्व कर्मचाऱ्यांना नोकरी देणार आहे. यामुळे या लोकांना रोजगार निर्माण होणार आहे. टाटाने गुजरात सरकारकडे जमीन हस्तांतरण शुल्कात सुट देण्याची मागणी केली आहे. टाटा मोटर्सने एकूण शुल्काच्या २० टक्के म्हणजेच ६६ कोटू रुपये देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गुजरात सरकारने हे मान्य केले आहे.
2011 मध्ये फोर्डने सुमारे 8000 कोटी रुपये गुंतवून साणंदमध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग प्लांट उभारला होता. जवळपास 10 वर्षात भारतीय बाजारपेठेत $2 अब्जांचे नुकसान सोसल्यावर फोर्डने सप्टेंबरमध्ये भारत सोडण्याचा निर्णय घेतला. फोर्ड इकोस्पोर्ट ही निर्यात होणारी शेवटची कार गेल्या महिन्यात तयार झाली. सानंद प्लांटमध्ये दरवर्षी 3 लाख ते 4.2 लाख कारचे उत्पादन होऊ शकते. आता येथे टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (TPEML) आपली इलेक्ट्रिक वाहने तयार करेल.