Ratan Tata Ford : जॅग्वारनंतर रतन टाटांचा Ford वर आणखी एक उपकार, करणार 'ही' मोठी मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2022 02:54 PM2022-05-29T14:54:50+5:302022-05-29T14:55:24+5:30
जग आर्थिक मंदीचा सामना करत असताना दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असलेल्या फोर्डची 2008 मध्ये टाटानं मदत केली होती. त्यावेळी त्यांनी फोर्डकडून Jaguar Land Rover ब्रान्ड खरेदी केला होता.
2008 मध्ये जॅग्वार लँड रोव्हर (Jaguar Land Rover) विकत घेऊन फोर्डला 'मदत' केल्यानंतर टाटा मोटर्सने (Tata Motors) पुन्हा एकदा फोर्ड मोटर कंपनीला (Ford Motor Company) मदतीचा हात पुढे केला आहे. दोन कंपन्यांमधील हे चढ-उताराचं नातं 1999 पासून आहे. कमी विक्रीमुळे फोर्डने गेल्या वर्षीच भारतीय बाजारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
वृत्तानुसार, गुजरात मंत्रिमंडळाची परवानगी ही या करारासाठी ग्रीन सिग्नल प्रमाणे आहे. प्लांट खरेदीबाबत दोन्ही कंपन्यांमध्ये अनेक मुद्द्यांवर अजूनही चर्चा सुरू आहे. यामध्ये कराराचा आकार, कामगार संबंधित समस्या, आर्थिक स्थिती आणि इतर समस्यांचा समावेश आहे. तथापि, दोन्ही कंपन्या 30 मे रोजी या करारासाठी सामंजस्य करार करतील अशी अपेक्षा आहे.
यापूर्वीही टाटांकडून फोर्डला मदतच
दोन्ही कंपन्यांमधील नातं तसं फार जुनं आहे. ही गोष्टही तितकी साधी नाही. रतन टाटा (Ratan Tata Ford Story) यांनी भारताची पहिली संपूर्ण स्वदेशी कार टाटा इंडिका (Tata Indica) लाँच केली. परंतु याला अपेक्षित यश मिळालं नाही. 1999 मध्ये टाटांनी आपल्या कार व्यवसायाची विक्री करण्यासाठी फोर्डशी संपर्क केला. परंतु त्यावेळी फोर्डचे प्रमुख असलेल्या बिल फोर्ड यांनी रतन टाटा यांना कारच्या बाबतीत काही माहितीच नाही, तर कारचं उत्पादन का सुरू केलं असं म्हटलं. टाटांचा कार व्यवसाय खरेदी करून फोर्ड उपकार करत आहे, असंही त्यांनी म्हटलं. परंतु यानंतर टाटांनी आपला व्यवसाय न विकण्याचा निर्णय घेतला.
2008 मध्ये खरेदी केली JaguarLandRover
2008 मध्ये जगाला आर्थिक मंदीचा सामना करावा लागला. यावेळी फोर्ड ही कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभी होती. त्याचवेळी रतन टाटा यांनी फोर्डला मदतीचा हात पुढे करून Jaguar Land Rover हा ब्रँड खरेदी केला. त्यांनी केवळ हा ब्रँड खरेदीच केला नाही, तर तो यशस्वीही करून दाखवला.