टाटा मोटर्सचा ग्राहकांना झटका; 17 जुलैपासून वाहनांच्या किमतीत वाढ, पाहा नवीन किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2023 03:39 PM2023-07-03T15:39:07+5:302023-07-03T15:59:57+5:30
Tata Motors : खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
Tata Motors Hikes Prices Update:कार खरेदी करण्याचा विचार करताय? तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. देशातील आघाडीची ऑटोमोबाईल कंपनी टाटा मोटर्सने (TATA motors) प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. 17 जुलै 2023 पासून विविध मॉडेल्स आणि व्हेरियंटच्या किमती 0.6 टक्क्यांनी वाढणार आहेत. खर्चात वाढ झाल्यामुळे कंपनीने हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
2023 मध्ये टाटा मोटर्सने प्रवासी वाहनांच्या किमतीत वाढ करण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी कंपनीने 1 फेब्रुवारी आणि 1 मे पासून किमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. 17 जुलैपासून ही भाडेवाढ ICE(रेग्युलर पेट्रोल-डिझेल गाडी) आणि इलेक्ट्रिक वाहनांना लागू होणार आहे.
लवकर करा बुकिंग
17 जुलैपूर्वी टाटाची गाडी खरेदी करणाऱ्यांना सध्याच्या किमतीत गाडी दिली जाणार आहे. कंपनी 16 जुलै 2023 पर्यंत कार आणि SUV चे बुकिंग करणार्या ग्राहकांना आणि 31 जुलै 2023 पर्यंत वाहनांची डिलिव्हरी घेणाऱ्या ग्राहकांना सध्याच्या किमतीत गाडी देणार आहे.
दर का वाढवले?
गाडी तयार करण्यासाठी लागणारा खर्च वाढल्यामुळे किमती वाढवल्याचे कंपनीने म्हटले आहे. यापूर्वी कंपनी स्वतःच जास्तीचा भार उचलत होती, मात्र आता हा बोजा ग्राहकांवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर Tiago, Tigor आणि Altrozसह सर्व प्रवासी वाहनांच्या किमती वाढतील. किमतीतील वाढ मॉडेल्स आणि व्हेरियंटनुसार केली जाईल.