टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत तब्बल डझनभर नवी वाहने आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2018 08:38 AM2018-08-08T08:38:18+5:302018-08-08T08:39:49+5:30
अल्फा आणि ओमेगा असे दोन नवे प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार आहेत.
नवी दिल्ली : रतन टाटा यांचे मोठे स्वप्न असलेल्या नॅनो कारने स्वप्नभंग केल्यानंतर टाटा मोटर्स पुन्हा नव्या दमाने बाजारात उतरली आहे. टियागो, नेक्सॉनच्या यशानंतर टाटा पुढील 5 वर्षांत एक-दोन नव्हे तब्बल डझनभर पॅसेंजर कार भारतीय बाजारात आणणार आहे.
टाटा मोटर्सच्या अपयशावरून काही महिन्यांपूर्वीच रतन टाटा यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यांचा नॅनो कारचा महत्वाकांक्षी प्रकल्पही बंद पडल्यात जमा आहे. गेल्या महिन्यात केवळ एक नॅनो कार सानंदच्या प्रकल्पातून बाहेर पडली. यावरून नॅनो कारचा प्रकल्प गुंडाळला जात असल्याचे दिसते. परंतू, टाटा कंपनीने जागतिक ख्यातीच्या जग्वार या कार निर्मात्या ब्रँडवर आपली मालकी मिळविल्यावर त्यांच्या कारमध्ये मोठे बदल झाले आहेत. नव्या प्लॅटफॉर्मवर बनविलेली टियागो ही हॅचबॅक आणि सब-4 मिटर सेडान टिगॉर या कारनी भारतीय बाजारात सनसनी आणली असताना कंपनीने नेक्सॉन ही मिनी एसयुव्ही प्रकारातील कार बाजारात आणत मारुतीच्या ब्रिझा आणि फोर्डच्या इकोस्पोर्टला चांगलीच टक्कर दिली आहे.
आता टाटा मोटर्स पुढील पाच वर्षांत सध्याच्या सेगमेंटमध्ये कायम राहण्याबरोबरच नवी 10 ते 12 वाहने बाजारात आणणार आहे. यासाठी दोन नवे प्लॅटफॉर्म बनविण्यात येणार असून ते अल्फा आणि ओमेगा असे असणार आहेत. याद्वारे कंपनी भारतीय प्रवासी वाहनांच्या बाजारात 90 टक्के अस्तित्व राहील, असे प्रवासी वाहन विभागाचे टाटा मोटर्सचे अध्यक्ष मयांक पारीख यांनी सांगितले. तसेच जुने प्लॅटफॉर्म बंद करण्यात येणार असून यापुढे 2 प्लॅटफॉर्म असणार आहेत.
पुढील वर्षी हॅरिअर ही एसयुव्ही लाँच होणार आहे. अल्फा प्लॅटफॉर्मवर 4.3 मिटर लांबीच्या हॅचबॅक आणि त्यापेक्षा मोठ्या एसयुव्ही प्रकारातील गाड्यांसाठी ओमेगा प्लॅटफॉर्म विकसित करण्यात येणार आहे.