TaTa Motors Record Loss: दणकून कार विकल्या तरीही टाटा तोट्यात; सांगितली दोन कारणे
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2022 11:44 AM2022-02-04T11:44:13+5:302022-02-04T11:47:26+5:30
TaTa Motors in Loss: डिसेंबरमध्ये कार विक्रीत ह्युंदाई मोटर्सला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकाविला, तसेच जानेवारीतही तुफान विक्री केली.
टाटा मोटर्सने गेल्या दोन महिन्यांत मोठी उसळी घेतली आहे. डिसेंबरमध्ये कार विक्रीत ह्युंदाई मोटर्सला मागे टाकून दुसरा क्रमांक पटकाविला, तसेच जानेवारीतही तुफान विक्री केली. परंतू एवढे करूनही ३१ डिसेंबरला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सला 1,451.05 कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. यासाठी टाटाने दोन कारणे दिली आहेत.
टाटा मोटर्सने तिसऱ्या तिमाहीत एकूण 72,229.29 कोटी रुपयांचा महसूल मिळविला. परंतू त्याच्या आदल्या वर्षीच्या तिसऱ्या तिमाहीत टाटा मोटर्सने 75,653.79 महसूल मिळविला होता. या तिमाहीत 2,941.48 शुद्ध नफा कमविला होता.
स्टँडअलोन आधारावर, 2020-21 च्या तिसऱ्या तिमाहीत 638.04 कोटी रुपयांच्या निव्वळ तोट्याच्या तुलनेत या कालावधीत टाटा मोटर्सने 175.85 कोटी रुपयांचा निव्वळ नफा नोंदवला. कंपनीने असेही म्हटले आहे की, तिसर्या तिमाहीत मिळणारा महसूल रु. 12,352.78 कोटी होता, जो मागील आर्थिक वर्षात याच कालावधीत रु. 9,635.78 कोटी होता.
तोट्याची कारणे काय...
टाटा मोटर्सच्या प्रीमियम युनिट जग्वार लँड रोव्हर (जेएलआर) ने देखील मागील वर्षाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत किरकोळ विक्रीत 37.6 टक्के घट नोंदवली. परंतू, उत्पादनाचे प्रमाण ४१ टक्क्यांनी वाढले. तसेच तोट्यासाठी कंपनीने सेमीकंडक्टरचा तुटवड्याला जबाबदार धरले आहे.
टाटा मोटर्सने सांगितले की, "सेमीकंडक्टरची कमतरता 2022 पर्यंत कायम राहण्याची अपेक्षा आहे, परंतु पुरवठा हळूहळू सुधारणे अपेक्षित आहे. चिप संकटाचा फटका या वर्षीही उद्योगाला बसू शकतो." जग्वार चौथ्या तिमाहीत चांगले प्रदर्शन करेल अशी अपेक्षाही टाटाने व्यक्त केली आहे.